08 March 2021

News Flash

दोन भारतरत्नांची कृष्णभुवनवर भेट..

ती भेट अनमोल होती. भेट देणारे आणि घेणारे दोघेही आपल्या क्षेत्रात अढळपदी विराजमान झालेली ‘भारतरत्ने’ होती. भेट स्वीकारण्यासाठी त्यांनी निवडलेले ठिकाणही आगळेवेगळे होते.

| March 10, 2014 04:28 am

ती भेट अनमोल होती. भेट देणारे आणि घेणारे दोघेही आपल्या क्षेत्रात अढळपदी विराजमान झालेली ‘भारतरत्ने’ होती. भेट स्वीकारण्यासाठी त्यांनी निवडलेले ठिकाणही आगळेवेगळे होते. कला आणि खेळाची जाण असलेल्या एका राजकारण्याच्या घरी भेटीची झालेली ही देवाण-घेवाण सर्वच उपस्थितांना भारावून टाकणारी होती..कारण प्रथमच दोन भारतरत्ने भेट घेण्यासाठी एकत्र आली होती.
दादर येथील राज ठाकरे यांचे निवास्थान ‘कृष्णभुवन’ कायमच गजबजलेले असते. राजकारण्यांचीच नव्हे तर समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची येथे येजा असते.
आजचे निमित्त थोडे आगळे वेगळे म्हणावे लागेल. कारण सचिनच्या नव्या घरातील म्युझिक रूममध्ये लता मंगेशकर यांची एखादी आठवण त्याला हवी होती. राज यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आणि लतादीदींनी स्वत: लिहून गायलेल्या गाण्यांचा कागद एका सुंदर फ्रेममध्ये गुंफू ला. ‘तू जहा, जहा चलेगा,’ आणि ‘पियां तोसे नैना’ ही लतादीदींच्या हस्ताक्षरातील गाणी सचिनच्या म्युझिक रुममधील भिंतीवर विराजमान होणार आहे.
या अनोख्या भेटीमुळे दोन भारतरत्ने एकत्र आली हा माझ्यासाठी आनंदयोग असल्याचे राज म्हणाले.
लतादीदींच्या गाण्यांचा मी लहानपणापासून फॅन आहे. माझ्या म्युझिक रूममध्ये लतादीदींची स्वत:च्या वापरातील एखादी गोष्ट मला हवी होती, असे सचिनने सांगितले. तसेच लतादीदी या मला आईसारख्या असल्याचे सांगून आपला स्वाक्षरी असलेला टी शर्ट त्यांना दिला. या वेळी लतादीदी म्हणाल्या, सचिनचे क्रिकेट मला खूप आवडते. त्याला कितीतरी वेळा खोटे आऊट देण्यात आले. परंतु जसा तो खेळाडू म्हणून मोठा आहे तसाच माणूस म्हणूनही तो मोठा असल्याने खिलाडूवृत्तीने, न चिडता तो चुकीचे आऊट दिल्यावर परत जात असे. आमच्या घरात सर्वानाच सचिन आवडतो. तो निवृत्त झाला तेव्हा दु:ख झाले. कोणत्या तरी दुसऱ्या खेळात तो जाईल. मात्र समालोचन करणार नाही, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमानंतर राज यांनी सचिन व लतादीदींचा शाल देऊन सत्कारही केला. मनसेच्या आठव्या वर्धापन दिनीच झालेला अनोखा कार्यक्रम कायम स्मरणात राहणार असल्याचे राज म्हणाले.
सचिनही त्याच वाटेवर ?
लता मंगेशकर यांनी नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे. तर राज ठाकरे यांनीही रविवारीच मोदींना पाठिंबा दर्शविला. सचिन तेंडुलकर राज यांच्या निवासस्थानी लतादीदींची भेट स्वीकारण्यासाठी आला. यामुळे सचिनही याच वाटेने जाणार की काय, अशी शंका काँग्रेसच्या वर्तुळात घेतली जाऊ लागली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2014 4:28 am

Web Title: sachin tendulkar says he is like a son to lata mangeshkar
Next Stories
1 ‘दर्शनदुर्लभ’ गाडय़ा..
2 ‘ह्य़ुमॅनिटी ट्रस्ट’चा विशिष्ट धर्माशी संबंध नाही-आमीर खान
3 कळव्यात मुलाची हत्या
Just Now!
X