आपण सर्वांनी कधी ना कधी रूबिक क्यूबचे कोडे सोडवायचा प्रयत्न केला तर असेलच. बऱ्याच जणांना ते कदाचित सुटले असेलही किंवा न सुटण्या एवढं बिघडलं असेल. पण आपल्यापैकी कित्येकांनी ते डोळे बंद करून सोडवायचा प्रयत्न केलाय? हो काही लोकं अगदी डोळे बंद करूनही सोडवतात हे रूबिक क्युबचे कोडं. अशाच एका जिनियसचा विडिओ सचिन तेंडुलकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने एका तरूणाची विडिओ क्लिप शेअर केली आहे. या तरूणाने रेकॉर्ड टाइममध्ये रुबिक क्युबचे कोडे सोडवले आहे. पण त्याने डोळे बांधून हे कोडे सोडवले या गोष्टीने मास्टर ब्लास्टरला जास्त प्रभावित केले .

“या युवकाची आणि माझी भेट काही काळापूर्वीच झाली आणि तो न बघता काय करू शकतो याने मी फारच आश्चर्यचकित झालो आहे – आपल्यापैकी बहुतेकजण बघुनही जी गोष्ट करू शकत नाहीत,” सचिनने व्हिडिओ शेअर करताना असे लिहिले आहे.

आपल्याला माहिती आहे का या भारतीय तरूणाने गिनीज बुकमध्ये आपले नाव कोरले आहे. आपल्या सर्वांना त्याचा अभिमान आहे. या विडिओमध्ये मोहम्मद ऐमान कोली तेंडुलकरने विस्कटलेले क्यूब १७ सेकंदात सोडवताना दिसत आहे.

हा व्हिडिओ एका दिवसात इंस्टाग्रामवर २ दशलक्षांहून अधिक लोकांनी बघितला असून फेसबुकवर आणखी १.६ दशलक्ष लोकांनी बघितला आहे .

डिसेंबर २०१९ मध्ये, कोलीने पायांचा वापर करून सर्वात जलद वेळात क्युबचे कोडे सोडण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (जीडब्ल्यूआर) केला होता. त्याने मुंबईतील व्हीजेटीआय येथे क्यूब ओपन २०१९ मध्ये प्रमाणित ३x३x३ क्यूब सोडविण्यासाठी अवघ्या १५.५६ सेकंदाचा विक्रम नोंदवला होता.