अंबानी धमकी प्रकरण

उद्योगपती मुकेश अंबानी धमकी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या या गुन्ह््यांचा तपास करणाऱ्यां राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी महागडी दुचाकी जप्त केली. एका महिलेच्या नावे नोंद असलेल्या या दुचाकीचा वापर मुख्य आरोपी सचिन वाझे करीत होते, असा दावा ‘एनआयए’ अधिकाऱ्यांने केला. गेल्या वर्षी वाझे यांनी दुचाकीवरून काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास केला होता. त्या सफरीत वाझे यांनी हीच दुचाकी वापरल्याचा संशय आहे.

‘एनआयए’तील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुचाकी दमण येथून जप्त करण्यात आली. या प्रकरणात अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांसह आढळेल्या स्कॉर्पिओसह आठ महागड्या गाड्या ‘एनआयए’ने हस्तगत केल्या आहेत. त्यात वोल्वो गाडीचाही समावेश असून ती दमण येथून जप्त करण्यात आली होती.

दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बनावट नावाचा वापर करत वाझे यांच्यासाठी एक खोली आरक्षित करण्यात आली होती, अशी माहिती तपासादरम्यान ‘एनआयए’ला मिळाली. या माहितीत तथ्य आढळले असून सीसीटीव्ही चित्रणातून वाझे यांची या हॉटेलमध्ये ये-जा होती, असेही स्पष्ट झाले. एका सीसीटीव्ही चित्रणात ‘एनआयए’ अधिकाऱ्यांना वाझेंसोबत एक महिला आढळली. सोमवारी जप्त करण्यात आलेली दुचाकी याच महिलेच्या नावे नोंद होती, असे समजते.

गेल्या आठवड्यात ‘एनआयए’ने एका महिलेस ताब्यात घेत चौकशी के ली. तसेच तिच्या निवासस्थानी छापा तिच्या निवासस्थानीही छापा घालून शोधाशोध केली होती.