अँटिलिया स्फोटके आणि मनसूख हिरेन हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गेल्या आठवड्यात आरोपपत्रात दाखल केले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए ने कोर्टात तब्बल दहा हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये सचिन वाझेने स्फोटकांची गाडी का ठेवली होती त्याची कारणं मिळाली आहेत. बडतर्फ केलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेचा स्फोटकांनी भरलेली गाडी लावण्याचा हेतू एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून त्याची गमावलेली ओळख पुन्हा मिळवण्याचा होता असे आरोपत्रात म्हटले आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आरोपपत्रात म्हटले आहे की, सचिन वाझेला एका सक्षम अधिकाऱ्याने पोलीस सेवेत पुन्हा घेतले होते आणि त्याला क्राइम इंटेलिजन्स युनिट (CIU), क्राइम ब्रांच, मुंबई मध्ये त्या युनिटचे प्रभारी म्हणून नियुक्त केले होते. वाझेला अतिरिक्त कार्यालयात तैनात केले होते. वाझेला स्वतंत्र खोली देण्यात आली होती.

आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे की, सचिन वाझेला बराच काळ तुरुंगात असल्याने एक डिटेक्टिव्ह/एन्काऊंटर स्पेशालिस्टची ओळख पुन्हा मिळवायची होती. म्हणूनच त्याने जिलेटिनच्या कांड्या भरलेल्या स्कॉर्पियोचा वापर केला. उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला उद्देशून धमकीची चिठ्ठी सोडली. त्यांच्या निवासस्थानाजवळ गाडी लावली.

२५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पियो कार आढळून आली होती.तर या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह यानंतर काही दिवसांनी म्हणजेच ५ मार्च रोजी कळव्यातल्या खाडीमध्ये सापडला होता. आधी या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथक करत होतं. मात्र, त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार, हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला. या दोन्ही प्रकरणातल्या आरोपांवरुन वाझे यांना एनआयएकडून अटक कऱण्यात आली आहे.

एनआयएने दाखल केलेले आरोपपत्र सुमारे १०,००० पानांचे आहे. ज्यात वाझे, प्रदीप शर्मा, पोलीस निरीक्षक सुनील माने, बरखास्त कॉन्स्टेबल विनायक शिंदे, बरखास्त एपीआय रियाझुद्दीन काझी, नरेश गोर, आनंद जाधव, संतोष शेलार, सतीश मोथकुरी आणि मनीष सोनी यांचा समावेश आहे. सुमारे २०० साक्षीदारांची साक्ष आहे त्यापैकी २० संरक्षित साक्षीदार आहेत.