मुंबई हल्ल्यावेळी शहीद झालेल्या वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांचे हौतात्म्य व्यर्थ जायला नको, अशी भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज ११ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने इंडियन एक्स्प्रेस ग्रुपने ‘स्टोरीज ऑफ स्ट्रेंथ’ या कार्यक्रमाचे गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

गडकरी म्हणाले, आज या कार्यक्रमानिमित्त जेव्हा शहीद हेमंत करकरे यांची कन्या आपल्या भावना व्यक्त करीत होती. तेव्हा करकरेंची मला आठवण येत होती. त्यांचे बलिदान व्यर्थ जायला नको. आपण त्यांना कधीही विसरता कामा नये. त्याचबरोबर जे निरपराध लोक होते पीडित होते त्यांनाही आपण विसरता कामा नये. यावेळी इतिहासातील या बलिदानाला नव्या पिढीपर्यंत पोहोचवल्याबद्दल त्यांनी इंडियन एक्स्प्रेस ग्रुपचे आभारही मानले.

सामर्थ्यवान आणि शक्तिशाली व्यक्ती ही समाजात शांतता प्रस्थापित करु शकते. दुर्बल व्यक्ती केवळ अशांतता पसरवतात. त्यासाठी आपल्याला शक्तिशाली बनायला हवे. आपल्याला यासाठी शक्तिशाली बनायचे नाही की इतरांना भीती दाखवायची आहे तर यासाठी शक्तिशाली बनायचे आहे ज्यामुळे सर्वधर्म समभावाचा प्रसार होईल.

गडकरींना यावेळी त्या दिवसाची आठवण काढताना म्हटले की, मुंबईवर हल्ला झाला त्यावेळी मी मुंबईमध्येच होतो. ही घटना खूपच दुःखद होती. जनतेच्या मनात खूपच रोष होता. या घटनेदरम्यान मी हे पाहिले की मुंबईच्या जनतेने त्यावेळी खूपच संयम दाखवला आणि चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. दहशतवादाची कोणतीही जात किंवा धर्म नसतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील आपल्याला संदेश दिलाय की, कोणताही आघात झाला तरी आपल्या आई-बहिणींवर कोणतेही संकट ओढवता कामा नये. महाराष्ट्राने आज याच संस्कृतीचे संपूर्ण देशात उदाहरण ठेवले आहे. स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमध्ये बोलताना म्हटले होते की, मी इथे हे सांगण्यासाठी आलेलो नाही की आमचा धर्म श्रेष्ठ कसा आहे. तर मी यासाठी आलो आहे की, आपण जिथले आहात तिथला देवही श्रेष्ठ आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या या कार्यक्रमात १०० पेक्षा अधिक अशा लोकांवर चर्चा झाली जे २००८ मधील मुंबईवरील त्या भयानक हल्ल्यातून लढताना वाचले होते. या कार्यक्रमातून त्यांचा साहस आणि दुःख यांचा आजवरचा प्रेरक जीवनप्रवास मांडण्यात आला.