26 February 2021

News Flash

हळहळली मराठी मनोरंजनसृष्टी आणि प्रेक्षकही..

मराठी वाहिन्यांवरील मालिकांमधील कलावंत हे घराघरांत पोहोचत असल्यामुळे प्रेक्षकांशी त्यांचे एक नाते निर्माण होत असते. छोटय़ा छोटय़ा भूमिका साकारत आता ‘मला सासू हवी’ मध्ये आनंद

| December 25, 2012 04:48 am

मराठी वाहिन्यांवरील मालिकांमधील कलावंत हे घराघरांत पोहोचत असल्यामुळे प्रेक्षकांशी त्यांचे एक नाते निर्माण होत असते. छोटय़ा छोटय़ा भूमिका साकारत आता ‘मला सासू हवी’ मध्ये आनंद अभ्यंकर यांनी साकारलेल्या विनायक रत्नपारखी या भूमिकेमुळे घराघरांत ते लोकप्रिय ठरले.
सहकलाकार आणि निर्माते-दिग्दर्शक-तंत्रज्ञ अशा सर्वाशीच जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणारे आनंद अभ्यंकर आणि याच मालिकेत त्यांच्या मुलाचे काम करणारा अभिनेता अक्षय पेंडसे यांच्या अपघाती निधनाने अवघी मराठी मनोरंजनसृष्टी हळहळली तसेच सोमवारी सकाळीच टीव्हीवरून ही भीषण अपघाताचे वृत्त दाखविण्यात आल्याने प्रेक्षकांनीही हळहळ व्यक्त केली.
यापूर्वी अभिनेत्री भक्ती बर्वे, अभिनेत्री पद्मा चव्हाण, अभिनेता-लेखक संजय बेलोसे, जुन्या काळातील अभिनेता अरूण सरनाईक, अभिनेत्री शांता जोग, जयराम हर्डीकर अशा अनेक गुणी कलावंतांचे अपघाती निधन झाले होते. सोमवारी झालेल्या अपघातात एकाच मालिकेतील दोन कलावंत एकावेळी मरण पावल्याची घटना घडल्याने मराठी कलावंत, रसिक यांना धक्काच बसला आहे. ‘मला सासू हवी’ या मालिकेतील सहकलाकारांना हुंदका आवरता आला नाही. आपल्याबरोबर दररोज चित्रीकरणाला असणारे कलावंत आता आपल्यासोबत नसतील याचा एवढा धक्का त्यांना बसला आहे की बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते.

स्वप्नील जोशी -आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचे अपघाती निधन झाले यावर माझा विश्वासच बसत नाही.
सुशांत शेलार – ‘ह्या गोजिरवाण्या घरात’ या ई टीव्ही मराठीवरील मालिकेत आम्ही एकत्र काम केले होते. खरे सांगायचे तर आनंद अभ्यंकर यांच्याविषयीच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या आहेत.  सेटवर केलेल्या गमतीजमती तर आहेतच. परंतु, आता या क्षणी शब्दच फुटत नाहीयेत. दैवगतीचा हा फेरा आहे एवढे मात्र खरे.
वंदना गुप्ते – अतिशय गुणी कलावंत होता. ‘मातीच्या चुली’ या चित्रपटात सुधीर जोशी यांच्या निधनानंतर त्या जागी आनंद अभ्यंकरने काम केले. आता आनंदची जागा कोण भरून काढणार?
दिग्दर्शक शिरीष राणे – आता आपण दिग्दर्शित केलेल्या ‘लव्ह इन रिलेशनशिप’ या नाटकाचे प्रयोग सुरू होणार होते. आनंदला मध्यवर्ती ठेवूनच निरंजन ही व्यक्तिरेखा लिहिलेली होती. परंतु, आता त्या नाटकाचे काय करायचे हा प्रश्नच पडला आहे. माझ्या ‘मरेपर्यंत फाशी’, ‘जन्म’ या चित्रपटांबरोबरच जवळपास प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आनंदने काम केले होते. आमची चांगली मैत्रीही होती. त्याला डोळ्यासमोर ठेवूनच नाटक लिहिले होते. आनंद अतिशय सहृदय व महान माणूस, तितकाच घनिष्ठ मित्र, उत्कृष्ट सहकलावंत आणि मित्र होता.

तो सगळीकडेच होता..
– चिन्मय मांडलेकर
आनंददादा कोणे एके काळी मालिकांसाठी लिहायचा आणि त्या मालिकांमध्ये कामही करायचा. तो ताण किती असतो, हे त्याला माहीत होते. मी ‘असंभव’च्या वेळी हा ताण सहन करत होतो. त्या वेळी आनंददादा मला मोठय़ा भावाप्रमाणे समजावायचा. एवढा ताण घेऊ नकोस, असे सांगायचा. खूप गमतीशीर होता आनंददादा! आज ही बातमी कळल्यावर खूप मोठा धक्का बसला आहे. आनंददादा सगळीकडे असायचाच, पण आता तो कुठेच नाहीए..

.. तो फोन शेवटचा ठरला !
–  सतीश राजवाडे
माझी आणि आनंददादाची पहिली भेट ‘असंभव’च्या वेळीच झाली. त्या वेळी मी त्याला सांगितले होते की, ही माझी पहिलीच मालिका आहे. त्यामुळे टय़ुनिंग जुळायला वेळ लागेल. तो त्या वेळी काहीच बोलला नाही. मात्र मालिका सुरू झाल्यानंतर त्याने स्वतहून माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली होती. त्याच वेळी त्याचा मोठेपणा मला जाणवला. आनंददादा नेहमीच खूप फ्रेश असायचा. कोणत्याही शिफ्टला चित्रिकरण असले, तरी तो ताजातवाना होऊन मी सांगेन तेवढा वेळ आनंदाने काम करायचा. गेल्या आठवडय़ातच त्याने मला फोन केला होता. भेटायचे आहे, असे म्हणत होता. मी त्याला, आपण आठवडय़ानंतर भेटू या, असे सांगितले. पण तो आमचा शेवटचा फोन ठरला, यावर विश्वासच बसत नाही.
‘त्याने’ असे जायला नको होते – रवि जाधव
आनंददादा नावाप्रमाणेच अतिशय आनंदी होता. ‘बालगंधर्व’च्या वेळी मी, सुबोध, तो आम्ही सगळे एकत्र खूप मस्ती करायचो. आपले वय, मोठेपणा विसरून तो आमच्यामध्ये खूप चांगला रूळला होता. आपल्यापेक्षा मोठा कलाकार आपल्याला मित्रासारखी वागणूक देतो, ही भावनाच खूप सुखावह असते. आनंददादाने ही भावना वारंवार आम्हाला दिली. त्याची ‘असंभव’मधील भूमिका तर त्याच्या कारकिर्दीतील अजरामर भूमिका होती. ती भूमिका करणे आव्हानात्मक होते. पण आनंद दादाने हे आव्हान लिलया पेलले. आत्ताच त्याला धर्मा प्रोडक्शनचा एक हिंदी चित्रपटही मिळाला होता. पण तो राष्ट्रीय
स्तरावर पोहोचण्याआधीच आपल्यातून निघून गेला. त्याचा अंत दुर्दैवी आहे. त्याच्यासारख्या
सतत जिवंत असलेल्या माणसाचे निधन असे अपघातात व्हायला नको होते.    
अभिनेता आनंद अभ्यंकर कारकीर्द
मराठी चित्रपट: मातीच्या चुली, कूंकू लावते माहरेचं, अकलेचे कांदे, ही पोरगी कुणाची, स्पंदन, मरेपर्यंत फाशी, बालगंधर्व, चेकमेट, चिमणी पाखरं, आयडियाची कल्पना
हिंदी चित्रपट – तेरा मेरा साथ रहें, जिस देश में गंगा रहता हैं, वास्तव : द रिअ‍ॅलिटी, पप्पू काण्ट डान्स साला, एक विवाह ऐसा भी
नाटक – कुर्यात सदा टिंगलम्, पपा सांगा कुणाचे, श्री तशी सौ, असामी असा मी, फिफ्टी-फिफ्टी.
मालिका – दामिनी, या सुखांनो या, कल्याणी, आधार सावलीचा, ह्या गोजिरवाण्या घरात, घरकुल, असंभव,  मला सासू हवी इत्यादी.
लेखक – कुणासाठी कुणीतरी ही मालिका आणि  ‘मरेपर्यंत फाशी’ चित्रपटाचे लेखन
हिंदी मालिका – तारक मेहता का उल्टा चष्मा या गाजलेल्या मालिकेत भूमिका

अक्षय पेंडसे कारकीर्द महत्त्वाचे टप्पे :
‘सिगारेट’ या प्रायोगिक नाटकातील भूमिकेमुळे प्रकाशझोतात. ‘उत्तरायण’ चित्रपटात शिवाजी साटम यांच्या मुलाची व्यक्तिरेखा. ‘मला सासू हवी’ मालिकेतील विघ्नेश रत्नपारखी ही व्यक्तिरेखा. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘कायद्याचे बोला’ चित्रपटात भूमिका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2012 4:48 am

Web Title: sadness feeling in around entertainment field and in auidence
टॅग : Entertainment
Next Stories
1 करारपत्रास नकार दिल्याने शाळांच्या बसेस बंद होणार?
2 पतीदेखत महिलेचा घोडबंदर रोडवर विनयभंग
3 कांदिवलीतील मुलीचा विनयभंग नव्हे, तर बलात्कार
Just Now!
X