स्वच्छ, सुरक्षित आणि पौष्टिक अन्न देणाऱ्या हॉटेलांची तपासणी करून त्यांना मानांकन देण्यात येणार आहे. राज्य अन्न व औषध प्रशासनाच्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या या उपक्रमामध्ये राज्यभरातील ३० हॉटेलांची तपासणी करण्यात आली असून गुरुवारी ७ जून या जागतिक अन्न सुरक्षा दिनाच्या निमित्ताने या हॉटेलांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हॉटेल किंवा अन्य खाद्यपदार्थ विकणाऱ्या ठिकाणी स्वच्छता पाळली जावी, या उद्देशाने अन्न व औषध प्रशासनाने हॉटेलची तपासणी करून मानांकन देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचे हॉटेल व्यावसायिकांवर कोणतेही बंधन नाही. परीक्षण केलेल्या हॉटेलच्या दर्शनी भागामध्ये हे मानांकन जाहीर केले जाईल, जेणेकरून ग्राहकांची हॉटेलबाबतची विश्वासार्हता वाढेल. तेव्हा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी का होईना हॉटेल व्यावसायिक या उपक्रमामध्ये सहभागी होतील, असे अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांनी सांगितले.

मुंबईतील १५, पुण्यातील १० आणि नागपूरमधील ५ अशा एकूण ३० हॉटेल व्यावसायिक यामध्ये सहभागी झाले आहेत. गिरगाव, जुहू चौपाटी यासारख्या गर्दीच्या ठिकाणी स्वच्छ व पौष्टिक खाद्य उपलब्ध व्हावे या हेतूने पालिकेच्या मदतीने अशी मानांकन केलेली हॉटेल असावीत, यासाठीदेखील प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. नागपूर आणि पुण्यामध्येदेखील हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे, असेही पुढे दराडे यांनी सांगितले.

सुरक्षित आणि पौष्टिक आहाराबाबतच्या उपक्रमांबाबत बोलताना अन्न व सुरक्षा मानके प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी पवन अग्रवाल यांनी सांगितले की, घर, शाळा आणि कार्यालयांमध्ये सुरक्षित आणि पौष्टिक अन्न कसे दिले जावे, याबाबत पुस्तके प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

निकष काय?

  • खाद्यपदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तींनी हात, तोंड झाकलेले असणे, व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा संसर्गजन्य आजार झालेला नसावा यासारखी स्वच्छता पाळलेली असावी.
  • पौष्टिक अन्नाचा प्रचार केला जावा, ग्राहकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेतली जावी,
  • स्वयंपाकघर पारदर्शक असावे किंवा ग्राहकांना स्वयंपाकघर पाहण्याची संधी दिली जावी अशा निकषांवर हॉटेल व्यावसायिकांनी स्वत:चे परीक्षण करावे.