मुंबईहून कोल्हापूरला जाणाऱ्या सह्याद्री एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने ही गाडी ठाणे स्थानकाजवळ रखडली. संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे या गाडीच्या मागे असलेली बदलापूर जलद गाडय़ा रखडल्या. परिणामी डाउन जलद महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. मात्र त्यानंतर या मार्गावरील वाहतूक डाउन धीम्या मार्गावरून पुढे नेण्यात आली. संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या सेवांचा बोजवारा उडाला.
सह्याद्री एक्सप्रेस ठाण्याला प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर आली असता सायंकाळी ६.३०च्या सुमारास या गाडीच्या इंजिनात बिघाड झाला. त्यामुळे ही गाडी जवळपास तासभर प्लॅटफॉर्ममध्येच अडकून पडली. यामुळे या गाडीमागे असलेली बदलापूर जलद गाडी अडकली. त्यानंतर असलेल्या सर्व जलद गाडय़ा मुलुंडहून धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या. ही वेळ चाकरमानी घरी परतण्याची असल्याने प्रवाशांना या तांत्रिक बिघाडाचा चांगलाच फटका बसला. या बिघाडामुळे एकही लोकल गाडी रद्द करण्यात आली नसली, तरी गाडय़ा अर्धा तास उशिराने धावत होत्या. तसेच ठाणे स्थानकात प्रचंड गर्दी जमा झाली होती.