विशेष सुरक्षा पथकाची (एसपीजी) सुरक्षा व्यवस्था असल्याने मुंबई भेटीत राहुल गांधी यांना राज्य सरकारच्या ‘सह्य़ाद्री’ अतिथिगृहात वास्तव्य करण्याची परवानगी मिळावी म्हणून काँग्रेसच्या वतीने राज्य सरकारला पत्र देण्यात आले होते. पण सरकारकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने राहुल यांच्यासाठी वांद्रे येथील ‘एमसीए’मध्ये व्यवस्था करण्यात आली होती.
‘एसपीजी’ सुरक्षा व्यवस्था असलेल्या नेत्याला शासकीय अतिथिगृहात थांबण्याची परवानगी दिली जाते. यानुसार राहुल गांधी यांना ‘सह्य़ाद्री’ अतिथिगृहात परवानगी मिळावी, असे पत्र मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी राज्य सरकार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले होते. पण राज्य शासनाकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही, असे निरुपम यांनी सांगितले. ‘सह्य़ाद्री’ अतिथिगृहात राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या पाहुण्यांसाठीच जागा उपलब्ध करून दिली जाते. राहुल गांधी यांना ‘स्टेट गेस्ट’चा दर्जा देऊ नका, पण सुरक्षेच्या कारणावरून तरी जागा मिळावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती.
काँग्रेसची असताना लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज्य यांच्यासह भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना हे अतिथिगृह उपलब्ध करून देण्यात आले होते, याकडे माजी राजशिष्टाचारमंत्री सुरेश शेट्टी यांनी लक्ष वेधले.

अमित घोडा यांना  शिवसेनेची उमेदवारी
मुंबई: शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी अमित कृष्णा घोडा यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर झालीआहे. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा ९ तर उद्धव ठाकरे यांची सभा १० फेब्रुवारीला होईल.