|| अक्षय मांडवकर

सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वाघाचे दर्शन

सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये कॅमेरा ट्रॅपिंग पद्धतीच्या आधारे वाघाला टिपण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना अखेर यश मिळाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रकल्पाच्या परिक्षेत्रामध्ये कॅमेरा ट्रॅप लावून वाघाला टिपण्याचा प्रयत्न वन विभागाकडून करण्यात येत होता. अखेरीस मे महिन्यामध्ये दोन वेळा साधारण वीस दिवासांच्या अंतराने चार ते पाच वर्षांच्या नर वाघाला चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत कॅमेऱ्याने टिपले आहे. त्यामुळे वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅपिंगच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय प्रकल्प अधिकाऱ्यांनी घेतला आहे.

चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय २०१० साली घेण्यात आला. चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे ३१७.६७० चौ.कि.मी. आणि कोयना वन्यजीव अभयारण्याचे ४२३.५५० चौ.कि.मी. असे क्षेत्र मिळून सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. कोयना, राधानगरी आणि चांदोली अभयारण्याच्या परिक्षेत्रामध्ये वास्तव्यास असणाऱ्या वाघांच्या संवर्धनासाठी राज्यात सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्प या चौथ्या व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. मात्र प्रकल्पाच्या निर्मितीनंतर केवळ वाघाच्या पायाच्या ठसे, त्याची विष्ठा आणि स्थानिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वाघाचे अस्तिव प्रकल्पक्षेत्रामध्ये असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना होती.

मात्र त्यासंबंधी कोणत्याही प्रकारचे शास्त्रीय पुरावे वन विभागाकडे  उपलब्ध नव्हते. चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या खालील बाजूस असणाऱ्या कोकण पट्टय़ामध्ये वाघाचे दर्शन होत असल्याची माहिती वारंवार स्थानिकांकडून वन विभागाला देण्यात येत होती. मात्र ठोस पुराव्यांअभावी वन विभागाकडून याला दुजोरा दिला जात नव्हता.

२०१६ साली वाघाच्या अस्तित्वाबाबत शास्त्रीय माहिती मिळविण्याच्या उद्देशाने वन विभागाने कॅमेरा ट्रॅपिंगचा आधार घेतला. त्यासाठीभारतीय वन्यजीव संस्थान (वाल्ईडलाईफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया) या संस्थेतर्फे प्रकल्पाच्या संपूर्ण परिक्षेत्रात २२५ कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते. मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाघाला टिपण्यात वन विभागाला यश मिळाले नाही.

अखेरीस चांदोली राष्ट्रीय उद्यानात ५ मे रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास आणि २३ मे रोजी सकाळी साडेसहा वाजता चार ते पाच वर्षांच्या एका नर बिबटय़ाला कॅमेऱ्यात टिपण्यात आल्याची माहिती सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक आणि मुख्य वनसंरक्षक व्ही. क्लेमेंट बेन यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. प्रकल्पाच्या निर्मितीपासून वाघाच्या अस्तिवाचा ठोस शास्त्रीय पुरावा विभागाकडे नव्हता.

त्यामुळे कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून मिळालेल्या छायाचित्रणाच्या आधारे चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत वाघाचे अस्तिव असल्याचा शास्त्रीय पुरावा विभागाला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय या माहितीमुळे वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रकल्प परिक्षेत्रात आणखी १०० कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे क्लेमेंट बेन म्हणाले.