शिर्डीतील बंदवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरीच्या विकास आराखडय़ातून साई जन्मस्थळाचा उल्लेख वगळण्यात येईल असे सांगितले होते. मात्र, यावर पाथरीचे रहिवासी नाराज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव हे पाथरीच्या रहिवाशांच्या शिष्टमंडळासह मुंबईत पोहोचले आहेत. या ठिकाणी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आता याप्रकरणी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘शिर्डीवाले साईबाबा’ असं सामान्यपणे म्हटलं जात असलं तरी आता या साईबाबांसाठीच शिर्डीवासियांना झगडावे लागत आहे. त्याचे कारण म्हणजे साईबाबा यांच्या जन्मस्थळावरुन निर्माण झालेला वाद. परभणी जिल्ह्यातील पाथरी या गावच्या रहिवाशांनी साईबाबांचा जन्म पाथरीत झाला असल्याचा दावा केला असून शिर्डी त्यांची कर्मभूमी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पाथरी गावालाही शिर्डीप्रमाणे तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा अशी आग्रही मागणी पाथरीवासियांनी सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब करीत पाथरीसाठी १०० कोटी रुपयांच्या निधीची घोषणाही केली होती. मात्र, यावर शिर्डीवासियांनी आक्षेप घेतला आहे.

पाथरीच्या विकासाला शंभर कोटी देण्यास आमचा विरोध नाही. पण बाबांचे जन्मस्थळ पाथरी असल्याच्या तर्काला आमचा विरोध आहे. बाबांनी जन्मस्थळ उघड केले नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे जन्मस्थानावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ते भाविकांच्या श्रद्धा दुखावणारे आहे. त्यामुळे पाथरीची जन्मस्थळ म्हणून ओळख नको, अशी भूमिका घेत शिर्डी ग्रामस्थांनी रविवारपासून बेमुदत शिर्डी बंदचे आवाहन केले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी हा बंद मागे घेण्यात आला होता.

पाथरी विकास आराखडय़ातून उल्लेख वगळण्याचा निर्णय

साईबाबांचे जन्मस्थळ परभणी जिल्ह्य़ातील पाथरी असल्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या बैठकीस या तीर्थस्थळ क्षेत्राच्या विकास आराखडय़ासाठी १०० कोटी रुपये मंजूर केले होते. त्यावरून शिर्डीकर ग्रामस्थ संतप्त झाले होते. या पेचातून मार्ग काढण्यासाठी ठाकरे यांनी सोमवारी सह्य़ाद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पाथरीच्या विकास आराखडय़ातून साई जन्मस्थळाचा उल्लेख वगळण्यात येईल असे आश्वासन मुख्यंत्र्यांनी दिले होते. तर पाथरीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी १०० कोटी रुपये देण्यास हरकत नसल्याचे शिर्डीकर ग्रामस्थांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सोमवारी झालेल्या बैठकीत स्पष्ट केले होते. साईबाबांचे जन्मस्थळ कोणते, याबाबत शासनाची कोणतीही भूमिका आतापर्यंत नव्हती, ती तशीच राहावी, अशी अपेक्षा विखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिव लोखंडे व शिर्डी ग्रामस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.