News Flash

सेंट जॉर्ज मधील अंध करोना योध्याचा ‘डोळस दृष्टीकोन’!

लोकांसाठी झटणाऱ्या रुग्णालयातल्या राजूची गोष्ट

सेंट जॉर्ज मधील अंध करोना योध्याचा ‘डोळस दृष्टीकोन’!

संदीप आचार्य
मुंबई: करोनाच्या भीतीपोटी मोठमोठ्या डॉक्टरांनी गेल्या दोन महिन्यांपासून आपले दवाखाने बंद ठेवले असताना सेंट जॉर्ज रुग्णालयात टेलीफोन ऑपरेटर म्हणून काम करणारे राजू चव्हाण हे एक दिवसही रजा न घेता गेले दोन महिने रोज काम करत आहेत. अंध असूनही रुग्ण सेवेचा राजूचा ‘डोळस दृष्टीकोन’ करोनाच्या काळात घरी लपून बसलेल्या खासगी डॉक्टरांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरला आहे.

करोनाच्या गेल्या अडीच महिन्यात भल्या भल्यांचे सामाजिक कार्याचे खरे चेहेरे उघड पडले आहेत. शासकीय रुग्णालयातील अनेक वरिष्ठ डॉक्टर ही हातचं राखून काम करत असताना अंध असूनही टेलिफोन ऑपरेटरचे काम इमाने इतबारे करून राजूने शेकडो रुग्णांचा दुवा मिळवला आहे. शासकीय परीक्षा देऊन सेंट जॉर्ज रुग्णालयात २००९ पासून सेंट जॉर्ज रुग्णालयात टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करत आहे. २३ मार्च रोजी लॉकडाउन जाहीर झाल्यापासून अंधेरी व जोगेश्वरी दरम्यान राहाणाऱ्या ४४ वर्षांच्या राजू चव्हाण यांना छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील सेंट जॉर्ज रुग्णालयात कामावर जाण्यासाठी ज्या कसरती कराव्या लागल्या ते ऐकून अंगावर काटा उभारल्या शिवाय राहात नाही. मात्र राजूला याचे काहीच वाटत नाही. रेल्वे बंद, रिक्षा किंवा अन्य वाहन व्यवस्था नसताना अत्यावश्यक सेवेअंतर्गत असलेल्या बसने राजू रोज सेंट जॉर्ज रुग्णालयात कामाला येतो. यासाठी घरून चालत बस स्थानकापर्यंत जायचे. एरवी अंध म्हणून लोक हाताला धरून बसमध्ये चढण्यास मदत करायचे तसेच रस्ता बदलायला हात धरून न्यायचे. मात्र करोनाकाळात कोणी जवळही येत नव्हते तिथे हात धरण्याचा प्रश्नच येत नव्हता.

अंधेरी स्थानकापर्यंत एक बस, तेथून बस बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी दुसरी बस पकडायची. तिथे उतरल्यानंतर चालत सेंट जॉर्ज रुग्णालय गाठायचे. घरी जाताना जी बस पकडावी लागते ती दादर पर्यंत जाते. तेथून अंधेरीला जाणारी दुसरी बस पकडायची. त्यानंतर अंधेरी पश्चिमेहून पूर्वेला यायचे आणि पुन्हा तिसरी बस पकडून घरी जायचे. हा द्राविडी प्राणायाम करत राजू रोज सेंट जॉर्ज रुग्णालयात पोहोचून टेलिफोन ऑपरेटरचे काम इमाने इतबारे करत आहे. याबाबत राजू म्हणाला, एरवीही रुग्णालयात नातेवाईक, राजकारणी तसेच वेगवेगळ्या कामांचे फोन येतच असतात. पण करोनाच्या अडीच महिन्यात आमच्या फोनला क्षणभरही विश्रांती नाही. त्यातच पाच ऑपररेटरपैकी तिघांनी दांडी मारली आहे. अधिक्षक डॉ. आकाश खोब्रागडे सरांनी पर्यायी व्यवस्था केल्यामुळे दोन माणसे मिळाले. करोनामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात येता येणे शक्य नसल्याने सतत नातेवाईकांचे फोन सुरु असतात. रुग्ण नातेवाईकांची चौकशी करतात. मग संबंधित वॉर्डात फोन जोडून देऊन डॉक्टरांकडून रुग्णांची माहिती घेतात. लोकप्रतिनीधींचेही रुग्ण दाखल करण्यापासून अधीक्षकांशी बोलण्यासाठी फोन येतात. वॉर्डातील डॉक्टर व अन्य कर्मचार्यांच्या जेवणाचे डबे आले, डॉक्टरांचे निरोप, विभागात एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास रुग्णवाहिका बोलावण्यापासून नातेवाईकांना कळवण्यापर्यंत सतत फोन करत राहावे लागतात.

अनेकदा रुग्णांना मार्गदर्शन हवे असते तर कोणाला रुग्णवाहिका हवी असते. डॉक्टर व परिचारिका तसेच आमचे वॉर्डबॉय जीव धोक्यात घालून काम करत आहेत अशावेळी टेलिफोन ऑपरेटर म्हणून मीही अनेक रुग्णांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यापासून ते रुग्णवाहिका मिळवून देण्यापासून खूप मदत करू शकलो याचाच मला आनंद आहे. खरतर सरकारने एक आदेश काढून अपंग व अंध लोकांना कामावर येण्यातून सुट दिली आहे. अनेकांनी याचा फायदा घेत घरीच बसणे पसंत केले आहे. मात्र मला घरी बसावे असे कधी वाटलेच नाही, असे राजू चव्हाण याने सांगितले. नातेवाईक घाबरलेले असतात. अशावेळी त्यांना धीर देणे व रुग्णाच्या प्रकृतीची माहिती दिली म्हणजे त्यांना बरे वाटते. “माझ्या वाटचालीत सेंट जॉर्ज दंत महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. मानसिंह पवार यांचीही मला मदत झाली” असे राजूने आवर्जून सांगितले

अनेकदा स्वयंसेवी संघटना फोन करून मदत करायची तयारी दाखवतात तेव्हा अधीक्षकांकडे फोन जोडून देतो. आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसी लोकल ट्रेन सुरु झाल्याने माझा येण्याजाण्याचा त्रास कमी झाल्याचेही राजू आवर्जून सांगतो तेव्हा या अंध करोना योध्याचे कसे कौतुक करू हा प्रश्नच पडतो, असे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी सांगितले. सुरुवातीला आमच्याकडे करोना रुग्णांसाठी २० खाटा होत्या त्या वाढून आता २२० खाटा झाल्या आहेत तर अतिदक्षता विभागात ९२ खाटा आहेत. याशिवाय करोना रुग्णांसाठी १२ डायलिसीस मशीन आहेत. आजच्या दिवशी १९० करोना रुग्ण उपचारासाठी दाखल असून टेलिफोन ऑपरेटरचं काम हेही एक आव्हान असून नियमानुसार अपंग म्हणून कामावरण्यापासून सुट असतानाही राजू रोज कामावर येत आहे एवढेच नव्हे तर करोनाच्या काळात सर्वांनाच मदत करण्याचा त्याचा डोळस दृष्टीकोन दृष्टी असलेल्यांनाही विचार करायला लावणार असल्याचे डॉ. खोब्रागडे यांनी सांगितले.

पदवीधर असलेल्या राजू चव्हाण याची दृष्टी पदवीचा अभ्यास करत असताना अचानक गेली. तथापि याने खचून न जाता त्याने पदवीचे शिक्षण तर पूर्ण केलेच शिवाय ‘नॅब’ मधून अंधलोकांसाठीचे वेगवेगळे अभ्यासक्रम पूर्ण केले. यात मसाज करण्याची कला अवगत केल्यानंतर काही काळ मसाज करण्याचे कामही केले. यानंतर शासकीय परीक्षा देऊन सेंट जॉर्ज रुग्णालयात टेलिफोन ऑपरेटर म्हणून २००९ पासून काम करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2020 2:53 pm

Web Title: saint george hospital blind telephone operator raju chavans inspirational story in corona pandemic scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 वीजवापरानुसार बिलांमुळे ग्राहक-वीज कंपनी संघर्ष
2 उच्चभ्रू वस्त्यांमध्ये रुग्णसंख्येत वाढ!
3 रुग्णांना चाचणी अहवाल न देण्यामागे खाटांची चणचण
Just Now!
X