भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पहिल्यावहिल्या अर्थसंकल्पात नावीन्याचा दुष्काळ असला तरी, संत, महंत, महात्म, हुतात्मे आणि राजकीय नेत्यांच्या स्मारकांच्या घाऊक घोषणा करण्यात आल्या. दादर येथील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा पुनरुच्चार करतानाच, नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे बाबासाहेबांचे आणखी एक स्मारक उभारण्याचे जाहीर करण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर हुतात्मा राजगुरू, क्रांतीवीर लहुजी साळवे, वीर बाबूराव फुलेश्वर शेडमाके, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची स्मारके उभारण्याची घोषणा करण्यात आली.
इंदू मिलच्या जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकाचा गेल्या चार वर्षांपासून घोळ सुरू आहे. त्याच स्मारकाचा पुन्हा अर्थसंकल्पात उच्चार करणात आला आहे. त्याशिवाय पुढील वर्षी आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त कामठी येथे आणखी एक स्मारक उभारण्याचे घोषित करण्यात आले. त्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याच्या घोषणेलाही आता जवळपास दहा वर्षांचा काळ लोटून गेला आहे. भाजप-शिवसेना सरकारच्या ताज्या अर्थसंल्पात पुन्हा तीच घोषणा करण्यात आली आणि त्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईत व गोपीनाथ मुंडे यांचे औरंगाबाद येथे स्मारक उभारण्याचे जाहीर करण्यात आले. संत सेवालाल, संत मुंगसाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, संत तुकडोजी महाराज यांच्या समाधी स्थळांचा विकास करण्याचा मानस भाजप सरकारने व्यक्त केला आहे. त्यासाठी ३१ कोटी ७० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या भारतीय सैन्यदलातील वीरांना परमवीर चक्र देऊन गौरवण्यात येते. अशा वीरांचे भव्य स्मारक मुंबईत उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.