केंद्रीय नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत गुरुवारी देशातील बंदर आणि गोदी कामगारांना भरघोस पगारवाढ देणाऱ्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारानुसार कामगारांचे मूळ वेतन २० हजार ९०० ते ८८ हजार ७०० रुपये होणार आहे. कामगारांच्या निवृत्ती वेतनातही चांगली वाढ करण्यात आली आहे. १ जानेवारी २०१७ पासून पूर्वलक्षी प्रभावाने हा वेतन करार लागू होणार असल्याने कामगारांना थकबाकीचीही मोठी रक्कम मिळणार आहे.

देशातील ३० हजार बंदर व गोदी कामगारांना आणि १ लाख ५ हजार निवृत्त कामगारांना या वेतन कराराचा लाभ मिळेल, अशी माहिती अखिल भारतीय बंदर व गोदी कामगार महासंघाचे (कामगार) चिटणीस मारुती विश्वासराव यांनी दिली.

देशातील गोदी कामगारांच्या वेतनवाढीचा करार संपल्यानंतर नव्या कराराबाबत गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकार, पोर्ट ट्रस्ट प्रशासन आणि कामगार प्रतिनिधी यांच्यात वाटाघाटी सुरू होत्या. अखेर गेल्या महिन्यात ४ जुलैला दिल्लीत वेतनवाढीबाबत समझोता झाला. त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई पोर्ट ट्रस्टच्या एव्हलीन हाऊसमध्ये गुरुवारी द्विपक्षीय वेतन समितीची बैठक झाली. या बैठकीत इंडियन पोर्ट ट्रस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय भाटिया, विशाखापट्टणम पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष एम.टी.कृष्णा बाबू, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष निरंजन बन्सल, कोचिन पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष व्यंकटरामन अकार्जू, विभागीय केंद्रीय कामगार आयुक्त एन.एम.शेट्टी तसेच कामगार महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. एस.के. शेटय़े, सुधाकर अपराज, विद्याधर राणे, मोहम्मद हनिफ, केरसी पारिख, प्रभात सामंतराय, टी. नरेंद्र राव, प्रभाकर उपकर यांनी सह्य़ा केल्या. १ जानेवारी २०१७ पासून हा वेतन करार लागू करण्याचे या वेळी जाहीर करण्यात आले.

पोर्ट ट्रस्टच्या वसाहतीत राहणाऱ्या कामगारांना किमान २०३५ रुपये ते कमाल ९९१५ आणि वसाहतीत न राहणाऱ्या कामगारांना किमान ४२५५ रुपये ते कमाल १९, ६३५ रुपये मासिक वेतनवाढ मिळेल. निवृत्त कामगारांच्या मासिक निवृत्ती वेतनात कमीत कमी १५०० रुपये  आणि जास्ती जास्त ४५०० रुपये वाढ होईल. वेतनवाढीतील थकबाकीची मोठी रक्कम कामगारांना मिळणार आहे. वसाहतीत राहणाऱ्या कामगारांना किमान ४२ हजार ७३५ ते कमाल २ लाख ८ हजार २१५ रुपये आणि वसाहतीत न राहणाऱ्या कामगारांना किमान ८९ हजार ३५५ रुपये आणि कमाल ४ लाख १२ हजार ३३५ रुपये थकबाकी मिळेल. निवृत्त कामगगारांनाही किमान ३१ हजार ५०० रुपये ते कमाल ९४ हजार ५०० रुपये थकबाकी मिळेल. आगामी तीन महिन्यांत थकबाकीची रक्कम कामगारांना देण्याचे मान्य करण्यात आले आहे अशी माहिती विश्वासराव यांनी दिली.

वेतनवाढ अशी..

३१ डिसेंबर २०१६ रोजी कामगारांचे मूळ वेतन होते, त्यात ४० टक्के महागाई भत्ता समाविष्ट करुन त्यावर १०.६ टक्के वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा करार चतुर्थ व तृतीय श्रेणी कामगार व कर्मचाऱ्यांसाठी आहे. नवीन वेतन करारानुसार कामगारांचे मूळ वेतन २० हजार ९०० रुपये ते ८८ हजार ७०० रुपये असेल. त्यावर इतर भत्ते मिळून एकूण पगार २८ हजार २५० ते १ लाख ६ हजार ४१० रुपये मिळेल. ग्रॅच्युइटीची मर्यादा दहा लाख रुपयांवरून २० लाख रुपये करण्यात आली आहे. त्याचबरोबर वार्षिक वेतनवाढ तीन टक्के मिळणार आहे.