प्रसाद रावकर

महापालिका आयुक्तांचे आदेशू

बदली झाल्यानंतरही नव्या ठिकाणी रुजू न होता जुन्याच विभागांत ठिय्या मांडून बसणारे पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन बंद करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे आता प्रशासनाने अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची तयारी सुरू केली आहे.

भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जाऊ नये म्हणून पालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची दर तीन वर्षांनी बदली करण्यात येते. मात्र पालिकेच्या विविध विभागांमध्ये एकाच पदावर अनेक अधिकारी, कर्मचारी वर्षांनुवर्षे ठिय्या मांडून बसले आहेत. तर वरिष्ठांच्या मर्जीतील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांची त्याच विभागात केवळ एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर तांत्रिकदृष्टय़ा बदली करण्यात येते. मात्र ही मंडळी त्याच विभागात पूर्वीप्रमाणेच काम करीत असल्याचे निदर्शनास आले आहेत.

पालिकेच्या विविध विभागांमधील काही मंडळींना राजकीय वरदहस्त लाभला आहे. त्यामुळे त्यांची बदली करण्यास सामान्य प्रशासन धजावत नाही. बदली झालीच तर राजकीय नेत्यांकडून ती रोखण्याचे जोरदार प्रयत्न केले जातात. राजकीय दबाव डावलून संबंधितांच्या बदलीचे आदेश जारी झाल्यानंतरही नव्या विभागात रुजू होण्याऐवजी ही मंडळी त्याच कार्यालयात ठिय्या मांडून बसतात. पालिकेतील बदली टाळणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे.

कमला मिलमधील आगीनंतर जी-दक्षिण विभाग कार्यालयात वर्षांनुवर्षे एकाच पदावर कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. रस्ते, जल, घनकचरा, अनुज्ञापन, अतिक्रमण निर्मूलन आदी विभागांमध्ये बदली झाल्यानंतरही अनेक जण पूर्वीच्याच विभागांत ठाम मांडून बसले आहेत. या प्रकाराची आयुक्त अजोय मेहता यांनी गंभीर दखल घेतली आहे.

नव्या विभागात रुजू न होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन १५ दिवसांनंतर तात्काळ बंद करण्याचे आदेश अजोय मेहता यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत. आयुक्तांचे निर्देश लक्षात घेत सामान्य प्रशासन विभागाने बदलीच्या ठिकाणी रुजू न झालेल्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बदली टाळूंचे धाबे दणाणले आहेत.

अन्य कर्मचाऱ्यांवर भार

नव्या विभागात अधिकारी, कर्मचारी रुजू न झाल्यामुळे तेथील कामावर परिणाम होत असून त्यांच्या कामाचा भार अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांवर पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन बदली झाल्यानंतर १५ दिवसांमध्ये नव्या विभागात रुजू होण्याची मुदत संबंधितांना देण्यात येणार आहे.