06 March 2021

News Flash

२२ हजार कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा

२०१८ पासून वाढ देण्याचा निर्णय

राजेश टोपे

राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत २२ हजार ५०० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार १ एप्रिल २०१८ पासून या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळणार आहे. वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांच्या वेतनात भरीव वाढ करण्यात आली आहे. वेतनातील फरकापोटी २४२ कोटी ५३ लाख रुपये देण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात २००७ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात करण्यात आली. त्याअंतर्गत सुरू असलेल्या कार्यक्रमनिहाय पदांची निर्मिती केली गेली आणि त्यासाठी वेगवेगळे वेतन ठरत गेले. त्यानुसार ५९७ संवर्ग कार्यरत होते. त्या सर्वाचे एकत्रीकरण करताना शैक्षणिक अर्हता, जबाबदारी, अनुभव आदी बाबी विचारात घेऊन विविध कार्यक्रमातील पदांचे संलग्नीकरण करून ६९ संवर्गात त्याचे रूपांतर करण्यात आले.

राज्यातील सर्व भागांमध्ये विशेषज्ञ पदांचा अपवाद वगळता प्रत्येक पदाचे वेतन समान असावे, किमान वेतन कायद्याचे पालन करावे, शहरी भागातील कर्मचाऱ्यांचे वेतन ग्रामीण भागापेक्षा जास्त नसावे, आदी बाबी विचारात घेऊन वेतन सुसूत्रीकरण करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

सुधारित वेतन रचनेनुसार २२ हजार ५०० कर्मचाऱ्यांना फायदा होणार असून १२ हजार कर्मचाऱ्यांना किमान वेतनाचा लाभ होईल. त्यांचे वेतन १ एप्रिल २०१८ रोजी १५ हजार ५०० इतके निश्चित करण्यात आले आहे. कंत्राटी तत्त्वावर नेमण्यात आलेल्या बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना महिना १२ हजार ते १५ हजार वेतन दिले जाते. त्यांना आता २८ हजार रुपये मिळतील. परिचारकांचे वेतन ९ हजार ६०० रुपयांवरून १८ हजार रुपये करण्यात आले आहे. एकू ण वेतन सुधारणेनुसार फरकापोटी २४२ कोटी ५३ लाख रुपये देण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2020 12:23 am

Web Title: salary improvement for 22000 contract health workers abn 97
Next Stories
1 वीज देयकांची रक्कम कुलाबा आगारात पडून
2 मुंबई महानगरात रिक्षांसाठी कालमर्यादा १५ वर्षे
3 पर्यावरणपूरक वाहनांच्या खरेदीला ग्राहकांची पसंती
Just Now!
X