महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कामगारांना पगारवाढ देण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला. २०१२ ते २०१६ या कालावधीसाठी करण्यात आलेल्या १ हजार ६६८ कोटी रुपयांच्या वेतन कराराला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्यता दिली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या करारानुसार कनिष्ठ वेतन श्रेणीतील वाहकांचे मासिक वेतन ३ हजार ५०० रुपयांनी, कनिष्ठ वेतन श्रेणीतील चालकांचे मासिक वेतन ३ हजार रुपयांनी तर सहाय्यक आणि लिपिकांचे वेतन २ हजार ५०० रुपयांनी वाढणार आहे. मार्ग भत्ता वगळता उर्वरीत सर्व भत्ते सध्याच्या दराच्या तुलनेत दीडपटीने जास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे, अप्पर मुख्य सचिव अजितकुमार जैन, परिवहन विभागाचे प्रधान सचिव शैलेश कुमार शर्मा, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण, सरचिटणीस हनुमंत ताटे आदी उपस्थित होते.