News Flash

शेतीमाल विक्रीस पालिकेचा अडथळा!

खासदार गोपाळ शेट्टी करणार आंदोलन

संग्रहित

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : शेतकऱ्यांच्या शेत मालाला मुंबईत विक्रीसाठी पालिकेच्या तसेच खासगी वा आरक्षित जागेत परवानगी देण्याचे धोरण सरकारने मंजूर केलेले असताना उत्तर मुंबईतील बोरीवली – मागाठाणे येथे मात्र महापालिकेकडून भाजीपाला व फळविक्रीस अडथळा आणला जात आहे. भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी याप्रकरणी पालिका मुख्यालयात जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्या, दलालांकडून होणारी शेतकऱ्यांची अडवणूक लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ मध्ये शेतकऱ्यांना थेट त्यांचा शेतमाल विक्री करण्यास परवानगी दिली. त्यानुसार मुंबई महापालिका हद्दीत पालिकेच्या मोकळ्या जागा तसेच खासगी वा आरक्षित मोकळ्या जागांवर आठवडी बाजार भरविण्यास मान्यता दिली होती. राज्यात सत्ताबदलानंतर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पालिकेकडून अडवणूक केली जात असल्याचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांगितले. त्यांच्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघतील मागाठाणे येथे बऱ्याच काळापासून सुरु असलेली शेतमाल विक्रीच्या जागेवर पालिकेने हातोडा चालवून शेतमाल विक्रीस बंदी लागू केली. याप्रकरणी गोपाळ शेट्टी यांनी पालिका आयुक्त तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शेतमाल विक्रीत पालिकेने अडवणूक करू नये अशी विनंती केली. मात्र कायद्यावर बेट ठेवत बोरीवली येथील सहाय्यक पालिका आयुक्तांनी अडवणुकीचेच धोरण सुरु ठेवले आहे.

शेतकऱ्यांचा भाजीपाला विक्रीसाठी बोरीवली सहायक पालिका आयुक्तांकडे परवानगी मागितली असता सदर जागा मंडई म्हणून हस्तांतरित झालेली नाही तसेच पालिकेकडे हस्तांतरित करून तात्पुरत्या मंडईसाठी परवानगी मागितलेली नसल्याने आठवडा बाजाराच्या शेवटच्या दिवशी दुपारी १ ते ४ या काळात कोणत्याही छताशिवाय शेतमाल विक्रीस परवानगी देता येईल असे नमूद केले आहे. याचा अर्थ आठवड्यातून एक दिवस भर उन्हात १ ते ४ या वेळात फक्त विक्री करण्यास परवानगी देऊन महापालिकेने बळीराजाची क्रूर थट्टा चालविल्याचे गोपाळ शेट्टी म्हणाले. माझ्या मतदारसंघाची लोकसंख्या पाच लाख असून येथे पालिकेची अधिकृत मंडई किती व कोठे आहे याचे उत्तर देण्यास पालिका प्रशासन तयार नाही.

रस्त्यावर भाजीपाल विक्री केली जाते तीदेखील पालिका व पोलिसांना ‘प्रसाद’ देऊन. या सर्वात शेतकरी नाडला जात आहे व लोकांनाही ताजा भाजीपाला व फळे मिळण्यात अडचण होत असून पालिकेच्या दादागिरी विरोधात आता महापालिका मुख्यालयात जाऊन आंदोलन करावे लागेल असे खासदार शेट्टी म्हणाले. मुंबईतील पालिकेच्या ताब्यातील बहुतेक मंडयांची आज पुरती दुरवस्था झाली आहे. अनेक मंडयांमध्ये छत कधी कोसळेल याची खात्री नसल्याने जीव मुठीत धरून भाजीपाला विक्री केली जाते. पालिका स्वतः मंडयांसाठी व्यवस्था निर्माण करणार नाही आणि राज्य सरकारचा कायदा धाब्यावर बसवून शेतकऱ्यांनी नीट विक्री करू देणार नाही. महापालिका आयुक्त व मुख्यमंत्री खासदाराच्या पत्राचीही दखल घेणार नसतील व शेतकऱ्यांची अडवणूक करणार असतील तर हे काय फक्त बिल्डरांची सुपारी घेणार आहेत का, असा सवालही गोपाळ शेट्टी यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2020 4:05 pm

Web Title: sale of agricultural commodities mumbai municipal corporations creating problems scj 81
Next Stories
1 करोना मुंबईकरांची चिंता वाढवणार! रुग्णसंख्येत चार दिवसांत लक्षणीय वाढ
2 भारती सिंहचा पती हर्ष लिंबाचियाला एनसीबीकडून अटक
3 बेस्टच्या ताफ्यात वाढ!
Just Now!
X