कल्याणमध्ये घोटाळा उघडकीस; सर्व जनसाधारण * तिकीट विक्री केंद्रांची तपासणी करण्याचा निर्णय

मुंबई : जनसाधारण तिकीट बुकिंग सेवक म्हणजेच जेटीबीएस केंद्राद्वारे बोगस तिकिटे देणारा घोटाळा कल्याण पश्चिमेला असलेल्या जेटीबीएस केंद्रावर उघडकीस आला आहे. त्या केंद्र चालकाचे डिपॉझिट जप्त करून त्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या घटनेनंतर मध्य रेल्वेची सर्व जनसाधार तिकीट केंद्राची तपासणीही केली जाणार आहे.

तिकीट खिडक्यांसमोरील रांगेतून सुटका करण्यासाठी दोन रुपये जादा आकारून तिकीट देण्यासाठी ही केंद्रे स्थापण्यात आली. मात्र कल्याण रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या ९७ क्रमांकाच्या जेटीबीएस केंद्र चालकाने प्रवाशाला बोगस तिकीट दिले होते. जेटीबीएस केंद्रचालक प्रवाशांना तिकिटावर पेनाने स्थानकाचे नाव आणि रक्कम लिहून स्टँप मारून तिकिटे बेकायदेशीरपणे विकत होता. दररोज दोन हजारपेक्षा जास्त तिकीट तो अशा प्रकारे विकत होता. यामुळे केंद्र चालकाला दररोज तीन ते चार हजार रुपयांचा फायदा होत होऊ लागला. याविरोधात तक्रार रेल्वे बोर्डापर्यंत गेली. त्यामुळे रेल्वे बोर्डाने विशेष पथकाला धाड टाकण्यास सांगितले. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात विशेष पथकाने ही कारवाई केली होती. या कारवाईनंतर रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वेला याविरोधात पुढील कारवाई काय केली अशी विचारणा केली. त्याला मध्य रेल्वेकडून आता उत्तर देण्यात आले आहे. कल्याणमधील त्या केंद्र चालकाचे ५५ हजार रुपयांचे डिपॉझिट जप्त करतानाच त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला जाणार आहे. तसेच मध्य रेल्वे स्थानकाबाहेर असणारी सर्व जेटीबीएस केंद्रांतील तिकीट विक्रीची तपासणीही केली जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.