02 March 2021

News Flash

१९ दिवसांत तब्बल साडेदहा हजार घरांची विक्री

मुद्रांक शुल्कातील कपातीचा परिणाम

(संग्रहित छायाचित्र)

अमर सदाशिव शैला

राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात केलेल्या कपातीमुळे गेल्या तीन महिन्यांपासून बांधकाम क्षेत्रात मोठी आर्थिक उलाढाल सुरू झाली आहे. डिसेंबर महिन्यातील १९ दिवसांत मुंबईतील मालमत्तांच्या नोंदणीने १० हजार ४५७ चा आकडा गाठला आहे. २०१२ नंतर प्रथमच इतक्या मोठय़ा प्रमाणात घरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले आहेत.

या महिन्यात १९ डिसेंबपर्यंत राज्यातील मालमत्तांचे खरेदी-विक्री व्यवहार एक लाख ३९ हजारांपर्यंत पोहचले . घरांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची नोंदणी करण्यासाठी मोठय़ा संख्येने ग्राहक नोंदणी कार्यालयात येत आहेत. हा प्रतिसाद पाहता डिसेंबरअखेपर्यंत घरांच्या विक्रीत आणखी मोठी भर पडण्याची शक्यता आहे.

बांधकाम व्यवसायातील मंदीमुळे व्यावसायिक चिंतेत झाले होते. करोनामुळे बाजार ठप्प झाल्याने त्यात आणखी भर पडली. ‘नाईट फँक’ संस्थेच्या अहवालानुसार, मुंबई आणि परिसरात (एमएमआर) मिळून जूनअखेर सुमारे दीड लाख घरे विक्रीच्या प्रतीक्षेत होती. दरम्यान करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून बांधकाम व्यवसायाला सावरण्यासाठी सरकारने मुद्रांक शुल्कात ३ टक्के सवलत जाहीर केली. यालाच जोड म्हणून अनेक विकासकांनीही उरलेल्या २ टक्के मुद्रांक शुल्काचा भार उचलला, तसेच ग्राहकांना विविध सवलती देऊ केल्या. बँकांच्या व्याजदरातही मोठी घट झाली आहे. यातून घरांच्या खरेदीसाठी मोजाव्या लागणाऱ्या रकमेत बचत होणार असल्याने ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

तयार घरांना अधिक मागणी

सद्य:स्थितीत गृहकर्जावरील व्याजदर कमी झाले आहेत. मागील दोन-तीन वर्षांत घरांच्या किमतीही १५ ते १७ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. सध्या राज्य सरकारच्या सवलतीमुळे यात भर पडली आहे. विकासकांनी सवलती सुरूच ठेवल्या तर भविष्यात घर घेण्याच्या विचारात असलेले ग्राहकही आताच नोंदणी करतील. ग्राहकांकडून सध्या तयार घरांना अधिक मागणी आहे. परिणामी, प्रकल्प लवकर पूर्ण करण्याकडे विकासकांचा कल आहे, अशी माहिती नाइट फ्रँकच्या संशोधन (रिसर्च) विभागाचे संचालक विवेक राठी यांनी दिली.

विक्रमी नोंद..

* नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावरील (२०१२ सालापासूनच्या) आकडेवारीनुसार, मुंबईत पहिल्यांदाच मालमत्ता व्यवहारांनी १० हजारांचा टप्पा ओलांडला.

* यंदा सप्टेंबर महिन्यात ५५९७, ऑक्टोबरमध्ये ७९२९, नोव्हेंबरमध्ये ९३०१ आणि डिसेंबरमध्ये (१९ तारखेपर्यंत) १० हजार ४५७ घरांची विक्री झाली आहे.

* गेल्या वर्षी याच काळात अनुक्रमे ४०३२, ५८११, ५५७४ आणि डिसेंबर महिन्यात ६४३३ घरांची विक्री झाली होती.

मुद्रांक शुल्कातील सवलतीमुळे नागरिकांचा मालमत्ता खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळात आहे. करोनाआधीच्या काळापासून मंदावलेल्या बांधकाम क्षेत्राला यातून चालना मिळाली आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत घरांची विक्री वाढली आहे.

– ओमप्रकाश देशमुख, राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2020 12:12 am

Web Title: sale of ten and a half thousand houses in 19 days abn 97
Next Stories
1 मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती
2 “मेट्रो कारशेड स्थलांतरित करताना मुख्यमंत्र्यांनी कोणता ‘चांगला’ विचार केला होता? हे सांगावे”
3 मुंबईत रेल्वेरुळावर सापडले तिघांचे मृतदेह; आत्महत्या केल्याचा संशय
Just Now!
X