मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी गँगस्टार अबू सालेम यांच्यावर तळोजा कारागृहात गोळीबार करणाऱ्या देवेंद्र जगताप ऊर्फ जेडी याने सोमवारी न्यायालयात आपल्याला कारागृह पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप केला. त्यामुळे जेडीची ठाणे शासकीय रुग्णालयात पुन्हा तपासणी करण्यात यावी असे आदेश पनवेल सत्र न्यायालयाने दिले. तपासणीत जेडीच्या डाव्या हाताला व पायाला सूज आल्याचे उघड झाले. जेडीच्या या आरोपामुळे कारागृह पोलीस पुन्हा अडचणीत आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आरोपींना बेडय़ा ठोकणे किंवा मारहाण करणे पोलिसांना आता शक्य होत नाही. ही बाब चांगल्या प्रकारे माहीत असलेल्या जेडीने आज कारागृह पोलिसांना अडचणीत आणणारे वक्तव्य केले. मागील आठवडय़ात गुरुवारी जेडीने हाय प्रोफाइल आरोपी अबू सालेम याच्यावर त्याच्या अंडासेलमध्ये जाऊन गोळीबार केला. दोन गोळ्या झाडल्यानंतर तिसरी गोळी अडकल्याने सालेमचे उजव्या हाताच्या बोटावर निभावले मात्र या गोळीबार घटनेमुळे तळोजा कारागृहातील सुरक्षेचे वाभाडे निघाले असून चार जणांना निलंबित करण्यात आले आहे.
गोळीबार घटनेपासून कारागृह पोलिसांनी सतत तीन दिवस आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप जेडीने केल्याने त्याची शासकीय रुग्णालयात तपासणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या हल्ल्याची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली असल्याने नवी मुंबई पोलिसांनी जेडीचा ताबा मागितला आहे. जेडी हा कारागृह कैदी असल्याने त्याचा ताबा न्यायालयाच्या आदेशानेच घेतला जाणार आहे. पनवेल सत्र न्यायालयाच्या आदेशामुळे जेडीला संध्याकाळी ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. यापूर्वी पनवेल रुग्णालयात जेडीची वैद्यकीय तपासणी झाली होती पण त्यात त्याला मारहाण झाल्याची बाब स्पष्ट होऊ शकली नाही. त्यामुळे न्यायालयाने ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यास सांगितले. त्यानंतर मंगळवारी पुन्हा त्याला न्यायालयात हजर केले जाणार असून त्यानंतर नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग त्याचा ताबा घेऊन चौकशी करणार असल्याचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी सांगितले.