‘माफ करा. पण तुम्ही दाखल केलेला धनादेश वटण्यास संबंधित खात्यात पुरेशी रक्कम नाही’, हे वक्तव्य एरवी बँकेच्या कोणत्याही शाखेत ऐकताना काहीही वाटणार नाही. सामान्य उद्योगपती ते प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक यांच्याबाबत तर हे नेहमीचेच. मात्र कोटय़वधी रुपयांचा कर गोळा करणाऱ्या राज्याच्या विक्रीकर विभागाबाबत हा प्रकार घडला आहे. परताव्यापोटीचा २३ हजार रुपयांचा धनादेश विभागाच्या खात्यात पुरेशी रक्कम नाही म्हणून एका बँकेने तो उद्योगपती दाम्पत्याच्या हातात पुन्हा टेकविला!
मरिन लाइन्स येथील मेसर्स क्लासिक एन्टरप्राईजेसला विक्रीकर विभागाकडून कर परताव्याचा २३,१९८ रुपयांचा धनादेश मिळाला. अभियांत्रिकी क्षेत्रातील या कंपनीचे नितीन व प्रियांका चव्हाण हे मुख्य प्रवर्तक आहेत. त्यांना १७ ऑक्टोबर रोजीचा खाते देय असलेला (अकाउंट पेई) रिझव्‍‌र्ह बँकेच्या सीबीडी बेलापूर शाखेचा देय धनादेश १८ ऑक्टोबर रोजी मिळाला. तो २९ ऑक्टोबर रोजी कंपनीच्या खात्यात जमा करण्यासाठी बँकेत देण्यात आला. मात्र १ नोव्हेंबर रोजी त्यांना नेटबँकिंगच्या माध्यमातून ‘खात्यात पुरेशी रक्कम नाही’ हे कारण झळकलेले दिसले.
विक्रीकरासारख्या विभागाबाबत असे कारण कसे असू शकते या उत्सुकतेपोटी त्यांनी प्रत्यक्ष बँकेत जाऊन पाहिले असताही हीच सबब देण्यात आली. अखेर चव्हाण यांनी त्यांचे खाते असलेल्या सिंडिकेट बँकेच्या मरिन लाइन्स शाखेकडून तसे लेखी घेतले. धनादेश ‘बाऊन्स’ झाल्याचा मनस्ताप झाला तो वेगळाच. मात्र राज्य शासनाच्या एखाद्या विभागात एवढी रक्कम नाही, हे ऐकून त्यांना धक्का बसला.
याबाबत विक्रीकर विभागाचे सहआयुक्त आर. आर. पाटील यांनी विभागाच्या खात्यात ४.५० कोटी रक्कम असल्याचे ‘लोकसत्ता’ला सांगितले. तर ‘सिंडिकेट बँके’च्या जनसंपर्क अधिकाऱ्याने खात्यात पुरेशी रक्कम नसल्यास असे होऊ शकते, असे स्पष्टीकरण दिले. खात्यात रक्कम नसेल हे अशक्य मानले तरी धनादेश माघारी पाठविण्याचे गुपित कायम आहे. याबाबत संबंधित यंत्रणांनी चव्हाण यांच्याबाबत थेट लक्ष घालण्याचे आश्वासन ‘लोकसत्ता’ला दिले.