03 March 2021

News Flash

गोव्यात कचऱ्याचा डोंगर भुईसपाट!

साळीगावातील कचराभूमीत गेल्या २० वर्षांपासून कचऱ्याचा डोंगर

साळीगाव कचराभूमीतील डोंगर भुईसपाट झाला आहे.

विघटन, पुनर्प्रक्रिया, वीजनिर्मितीतून नवा आदर्श

जगभरातील पर्यटकांना आकर्षून घेणाऱ्या गोव्यात दररोज ६०० मेट्रिक टन कचरा साठू लागल्याने स्वच्छता, प्रदूषण आणि आरोग्याचा प्रश्न बिकट होत चालला होता. त्यामुळे पर्यटन उद्योगासाठी आणि स्थानिकांच्या आरोग्यासाठी कचरामुक्तीचा लढा गोव्याने उभारला असून त्यातून साळीगाव कचराभूमीतील डोंगर भुईसपाट झाला आहे.  राजकीय इच्छाशक्ती असली तर पुनर्प्रक्रिया चालना देऊनही कचरा- प्रश्न कसा सुटू शकतो, हे महाराष्ट्रालाही यातून शिकता येण्यासारखे आहे.

साळीगावातील कचराभूमीत गेल्या २० वर्षांपासून कचऱ्याचा डोंगर उभा राहिला होता. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दोन वर्षांपूर्वी या कचराप्रश्नाकडे जातीने लक्ष पुरवले आणि कचरामुक्तीचा लढा इथूनच सुरू झाला. स्वच्छता आणि जलप्रदूषणविरोधी कडक नियमांची अंमलबजावणी, स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग आणि मुख्य म्हणजे गोवेकरांचे मिळत असलेले सहकार्य यामुळे या लढय़ाला मोठे यश लाभत आहे.

अथांग समुद्रकिनारा आणि निसर्ग संपन्नता लाभल्यामुळे गोव्याने देश-विदेशी पर्यटकांच्या मनात मानाचे स्थान मिळविले आहे. आजघडीला गोव्याची लोकसंख्या साधारण १५ लाखांच्या घरात आहे. मात्र मोठय़ा संख्येने होणारी पर्यटकांची गर्दी पाहता गोव्यात सुमारे ४० लाख लोकांची वर्दळ असते. त्यामुळे गोव्यात दररोज तब्बल ६०० मेट्रिक टनाहून अधिक कचरा निर्माण होतो.

गेल्या २० वर्षांत उत्तर गोव्यातील २९ गावांमध्ये दररोज निर्माण होणारा तब्बल १७० ते २०० मेट्रिक टन कचरा १० हेक्टर क्षेत्रफळावर उभ्या असलेल्या साळीगाव कचराभूमीत टाकण्यात येत होता. त्यामुळे कचराभूमीत तब्बल सव्वालाख मेट्रिक टनाहून अधिक कचऱ्याचा डोंगर उभा राहिला होता. कचऱ्यातून निथळणारे पाणी भूगर्भात मुरून नैसर्गिक जलस्रोतांना धोका निर्माण होऊ लागला होता. कचराभूमी जवळील सालमोन्तो स्प्रींग नैसर्गिक झऱ्यासोबतच आसपासच्या परिसरातील विहिरी, तळी प्रदूषित होऊ लागली.  त्यातून जनजीवनही अनारोग्याच्या विळख्यात सापडण्याची भीती निर्माण झाली होती. त्यातून ही चळवळ उभी राहिली.

त्यात पहिला निर्णय हा घेण्यात आला की, कचरा जमिनीत गाडला जाणार नाही! कचरा नष्ट करण्यासाठी त्यातील कणन्कण वापरात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी नवी मुंबईस्थित एस. एफ. सी एन्व्हॉयर्नमेन्टल टेक्नॉलॉजी प्रा. लि. आणि गोव्यातील हिंदुस्तान वेस्ट ट्रीटमेन्ट प्रा. लि. या कंपन्यांचे सहकार्य घेण्यात आले. कचऱ्यातील पुनर्वापरायोग्य घटक आणि विघटनशील कचऱ्यावर कशी प्रक्रिया करायची याबाबत कंपनीचे संचालक संदीप आसोलकर यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली. अखेर साळीगाव कचराभूमीतच कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प उभारण्यावर शिक्कामोर्तब झाले आणि मे २०१६ मध्ये हा प्रकल्प उभा राहिला. प्रतिदिन १५० ते २०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये आहे.

प्रकल्प कार्यान्वित झाला त्यावेळी कचऱ्याचा डोंगर डोळ्यासमोर होता. अल्पावधीतच या संपूर्ण कचऱ्याला चाळणी लावून काच, धातू, कागद, कार्डबोर्ड, थर्माकोल, अ‍ॅल्युमिनिअम फॉइल पॅकेट, प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पातळ पिशव्या, चप्पल-बूट, नारळ, निरनिराळ्या प्रकारचे कापड, इलेक्ट्रॉनिक उपकरणे अशा तब्बल १४ वस्तू वेगळ्या करण्यात आल्या. यापैकी बहुतांश  वस्तू पुनर्प्रक्रियेसाठी पाठविण्यात आल्या. अन्नपदार्थ, भाजीपाला आणि वृक्षसंपदेमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून गॅस, वीज आणि खत निर्मितीचा प्रकल्प कचराभूमीतच उभा राहिला. प्रकल्पासाठी आवश्यक विजेची गरज त्यातूनच भागविली जात आहे. इतकेच नव्हे तर अतिरिक्त वीज खुल्या बाजारात विकली जात आहे. कचऱ्यापासून होणाऱ्या खताचा काही कंपन्यांना पुरवठा करण्यात येत आहे.

त्यानंतर उरणारा कचरा जाळून टाकण्याचा पर्यायही नाकारण्यात आला. आता हा कचरा इंधन म्हणून कोळशाला उत्तम पर्याय ठरला आहे. काही सिमेंट कंपन्या कोळशाऐवजी हा कचरा इंधन म्हणून घेऊ लागल्या आहेत. परिणामी साळीगावातील कचराभूमीतील कचरा संपुष्टात येत आहे.

आता कचराभूमीच्या जागेवर मोठे उद्यान फुलविण्याचा या कंपन्यांचा मनसुबा आहे. त्याचाच एक भाग म्हणून तेथे  तब्बल तीन हजार झाडे लावली गेली असून भाज्यांचीही लागवडकरण्यात आली आहे. एक छोटेखानी कृत्रिम तळे साकारण्यात आले असून त्यात नौकानयनाची सोय आहे. या कचराभूमीत शैक्षणिक सहलींचेही आयोजन करण्यात येत आहे. या जागेत पूर्वी कचरा वेचणाऱ्या १५० कचरावेचकांना या प्रकल्पातच सामावून घेण्यात आले आहे. त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी होते, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली जाते.

प्रत्येक कचरा वेगळ्या पिशवीत!

आता संपूर्ण गोव्यात केवळ ओला आणि सुका कचरा स्वतंत्र ठेवला जात नसून काळ्या पिशवीत काचा, गुलाबी पिशवीत कागद, पिवळ्या पिशवीत प्लास्टिक, पारदर्शक पिशवीत नारळ, पांढऱ्या पिशवीत थर्माकोल आणि कपडे ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.  एखाद्या ठिकाणी वृक्ष उन्मळून पडला अथवा फांद्या तुटून पडल्यास त्याचा भुगा करणारे यंत्रच घटनास्थळी जाते. फांद्याचा भुगा खत निर्मिती प्रकल्पामध्ये मिसळला जातो. कचरा गोळा करण्यासाठी घरटी ३६० रुपये कर आकारला जातो.

नुसती स्तुती, अनुकरण नाही!

मुंबई आणि गोव्यात निर्माण होणाऱ्या कचऱ्यात प्रचंड तफावत आहे. तरीही महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेला देवनार, कांजूर, मुलुंड कचराभूमीत साचलेल्या प्रचंड कचऱ्याची विल्हेवाट लावता आलेली नाही, हेही खरे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साळीगावच्या कचराभूमीची पाहणी करून या प्रकल्पाची तोंड भरुन स्तुती केली. मात्र आजतागायत मुंबईमधील कचराभूमींचा प्रश्न त्यांना सोडविता आलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2018 3:28 am

Web Title: saligao garbage treatment plant clean garbage in goa for for tourism industry development
Next Stories
1 जर्मनीमध्ये कारहल्ला? तीन ठार, ३० हून अधिक जखमी
2 नव्या रक्तचाचणीमुळे स्मृतिभ्रंशाचे निदान लवकर
3 सेक्सी दुर्गा चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे अन्यायाविरोधात पंतप्रधानांना पत्र
Just Now!
X