News Flash

सलमान खटल्याला नवे वळण!

सदोष मनुष्यवधाच्या आरोपांतर्गत अभिनेता सलमान खान याच्याविरोधात सध्या चालविण्यात येणाऱ्या खटल्यात सलमानच्या वतीने शुक्रवारी आणखी एक धक्कादायक दावा करण्यात येऊन खटल्याला नवे वळण देण्याचा प्रयत्न

| April 18, 2015 04:47 am

सदोष मनुष्यवधाच्या आरोपांतर्गत अभिनेता सलमान खान याच्याविरोधात सध्या चालविण्यात येणाऱ्या खटल्यात सलमानच्या वतीने शुक्रवारी आणखी एक धक्कादायक दावा करण्यात येऊन खटल्याला नवे वळण देण्याचा प्रयत्न केला गेला. अपघातात झालेला मृत्यू कारखाली चिरडून झालेला नाही. तर क्रेनद्वारे कार उचलताना क्रेनमधून कार निसटून पुन्हा जमिनीवर आदळल्याने झाला असावा, असा दावा सलमानच्या वतीने करण्यात आला.

कारखाली अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली होती. क्रेनने कार उचलण्याचा आणि कारखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु क्रेनमधून कार कोसळून जमिनीवर आदळली. त्यामुळे एकाचा मृत्यू झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.  तसेच असे घडल्याचे तीन साक्षीदारांनी न्यायालयासमोर सांगितल्याचे सलमानचे वकील श्रीकांत शिवदे यांनी न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला.
अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला असेल तरच आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवला जाऊ शकतो. परंतु या सगळ्या बाबींवरून या अपघातात मृत्युमुखी पडलेली व्यक्ती गाडी पुन्हा जमिनीवर आदळण्यामुळे मृत्युमुखी पडल्याचे दिसून येते. त्यामुळे सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवला जाऊ शकत नसल्याचा दावा शिवदे यांनी केला.  कारखाली चिरडून जखमी झालेल्यांच्या साक्षीच्या आधारे शिवदे यांनी आपला दावा न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला.
मृत्युमुखी पडलेल्याच्या शवविच्छेदन अहवालातही त्याच्या शरीराचा वरचा भाग चेपला गेल्याचे म्हटल्याचे शिवदे यांनी सांगितले. वेगाने येणाऱ्या कारखाली येऊन त्याचा मृत्यू झाला असता तर तो झोपलेले अंथरूण रक्ताने माखलेले असायला हवे होते. असे काहीच झालेले शवविच्छेदन अहवालातून पुढे आलेले नाही. पोलिसांनी क्रेनच्या चालकाचा जबाब का नोंदवला नाही, असा सवालही शिवदे यांनी उपस्थित केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 4:47 am

Web Title: salman case takes new turn
टॅग : Salman Khan
Next Stories
1 भाडेतत्त्वावर वातानुकूलित बसगाडय़ा, शाळांमध्ये विद्यार्थी पास
2 मुंबई ट्रान्स हार्बर लिंकऐवजी पाण्याखालून बोगदा हवा-गडकरी
3 मोनोचा अडीच तास खोळंबा
Just Now!
X