वांद्रे येथील अमेरिकन बेकरीसमोर १३ वर्षांपूर्वी २८ सप्टेंबर २००२ च्या रात्री  माझ्या गाडीने अपघात झाला त्यावेळी चालक अशोक सिंग हा ती गाडी चालवत होता. तसेच मी  त्या रात्री मद्यपानही केले नव्हते, असा दावा अभिनेता सलमान खानने शुक्रवारी सत्र न्यायालयात केला.
सदोष मनुष्यवधाच्या नव्या आरोपाअंतर्गत सलमानवर सध्या खटला चालविण्यात येत असून अतिरिक्त न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांच्यासमोर शुक्रवारी त्याचा आरोपी म्हणून जबाब नोंदविण्यात आला. सरकारी पक्षाच्या दाव्यानुसार अतिप्रमाणात केलेल्या मद्यपानामुळे सलमानचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने पदपथावर गाडी चढवून तेथे झोपलेल्यांना चिरडले. या वेळेस त्याचा अंगरक्षक रवींद्र पाटील त्याच्यासोबतच होता. त्यानेच या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि सलमानने अतिप्रमाणात मद्यपान केल्याचे तसेच आपण त्याला गाडी चालवू नको असे सांगूनही तोच गाडी चालवत असल्याचा जबाब पाटील याने दिला होता. मात्र शुक्रवारच्या सुनावणीत आपल्या बचावार्थ जबाब देताना सलमानने त्याच्यावर ठेवण्यात आलेल्या या सर्व आरोपांचे खंडन केले. अपघात झाला त्या वेळेस आपल्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता, हा आरटीओ अधिकाऱ्याने केलेला दावाही खोटा होता आणि त्याने  खोटी साक्ष दिल्याचेही सलमानने स्पष्ट केले. ९ अटकेनंतर रक्ताच्या चाचणीसाठी सलमानला जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले होते. त्या वेळेस त्याच्या रक्ताचे नमुने घेणाऱ्या डॉक्टरने साक्षीदरम्यान सलमानचे डोळे तारवटलेले होते, असे सांगितले होते.   त्यावर आपले डोळे  ताण-जागरणामुळे तारवटलेले असल्याचा दावा सलमानने केला.