बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि त्याच्या अंगरक्षकावर विमानतळ पोलीस ठाण्यात मारहाण आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधेरी न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर बुधवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या वर्षी ४ नोव्हेंबर रोजी विमानात एका प्रवाशाला मारहाण करून त्याच्याकडील कागदपत्रे हिसकावून घेतल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
 तक्रारदार रवींद्र द्विवेदी हे ४ नोव्हेंबर २०१४ रोजी मुंबईहून दिल्लीला विमानाने जात होते. त्या विमानात अभिनेता सलमान खान आणि त्याचा अंगरक्षक होता. या दोघांनी आपल्याला मारहाण केली आणि आपल्याकडील महत्त्वाची कागदपत्रे हिसकावून घेतली असा द्विवेदी यांचा आरोप आहे. ही कागदपत्रे दिवंगत भाजप नेते गोपिनाथ मुंडे यांच्या मृत्यूसंदर्भातली असल्याचा त्यांचा दावा आहे. या प्रकरणी त्यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने या तक्रारीवरून विमानतळ पोलिसांना सलमान खान आणि त्याच्या अंगरक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आम्ही सलसान खान आणि त्याच्या अंगरक्षकाविरोधात मारहाण, चोरी (भारतीय दंडविधान संहिता कलम ३९२, ३२३, ५०४) अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर नागभिरे यांनी दिली.