सलमान खानची खंत

भल्या पहाटे झाडलोट करून रस्ते लख्ख करणारे कामगार किंवा घरोघरी फिरून कचरा घेऊन जाणाऱ्यांना आपण कचरावाले म्हणतो. पण मुंबई अस्वच्छ करणारे मुंबईकरच खरे कचरावाले आहेत. त्यामुळेच मुंबई बकाल होत आहे, अशी खंत हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खान याने शनिवारी पालिका मुख्यालयात व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाच्या धर्तीवर महापालिकेतर्फे ‘स्वच्छ मुंबई’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा भाग म्हणून मुंबई हागणदारीमुक्त करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली असून त्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पालिकेच्या ‘स्वच्छ मुंबई’ अभियानांतर्गत हागणदारीमुक्त मोहिमेसाठी ‘सदिच्छा दूत’ म्हणून सलमान खान काम करण्याची तयारी सलमान खानने दर्शविली आहे.

सलमान खानने शनिवारी पालिका मुख्यालयात पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. या मोहिमेचा ‘सदिच्छा दूत’ म्हणून काम करण्याची तयारी या भेटीत सलमान खानने व्यक्त केली.

तसेच बिइंग ह्युमन या संस्थेच्या माध्यमातून पाच फिरती शौचालये देण्याची घोषणाही त्याने या वेळी केली.

परदेशात फिरायला गेल्यानंतर तेथील रस्त्यावर आपण कचरा टाकू का, असा सवल करीत सलमान खान म्हणाला की, मुंबईमध्ये स्वच्छता राखण्यासाठी पालिकेचे तब्बल ३० हजारांहून अधिक कर्मचारी तैनात आहेत.

भल्या पहाटे हातात झाडू घेऊन ते मुंबई स्वच्छ करतात. समुद्रकिनारे, सार्वजनिक ठिकाणे, नाले, कचरा टाकण्याच्या जागा स्वच्छ केल्या जातात. परंतु मुंबईकरांकडून या कामात सहकार्य केले जात नाही, अशी खंत सलमानने व्यक्त केली. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, ‘बिइंग ह्युमन’ संस्थेच्या अलविरा खान-अग्निहोत्री आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

मुंबई माझी मातृभूमी

मुंबई ही माझी केवळ कर्मभूमीच नाही, तर मातृभूमी आहे, असे सांगत सलमान खान पुढे म्हणाला की, लहानपणी आपण ज्या भागात राहत होतो तेथे हागणदारीचा प्रश्न गंभीर होता. आपल्या माता-भगिनींसाठी मुंबई हागणदारीमुक्त झालीच पाहिजे. त्यासाठी सर्वानी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. पालिका सर्वतोपरीने प्रयत्न करीत आहे. पण पालिकेला आपण सर्वानी सहकार्य करण्याची गरज आहे, असे आवाहन सलमान खानने मुंबईकरांना केले.

मुंबई पालिकेचे हजारो कर्मचारी  भल्या पहाटे हातात झाडू घेऊन मुंबई स्वच्छ करतात.  परंतु मुंबईकरांकडून या कामात सहकार्य केले जात नाही. त्यामुळे मुंबई बकाल होत आहे. आपण सर्वानी पालिकेला सहकार्य करण्याची गरज आहे.  – सलमान खान, अभिनेता