अभिनेता सलमान खानच्या नावाने गेले काही दिवस व्हॉटसअपवर वादग्रस्त मजकूर असलेले पोस्ट आणि छायाचित्र पसरत आहे. त्याविरोधात खानच्या व्यवस्थापकाने गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.
अभिनेता सलमान खान याचा ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्या पाश्र्वभूमीवर सलमान खान एका विशिष्ट समाजाबद्दल अनुद्गार काढत असल्याचे व्हॉटसअपवर पसरवले जात आहे. त्यामुळे गेल्या आठवडय़ात सलमान खानच्या व्यवस्थापकाने मुंबई गुन्हे शाखेकडे याबाबत तक्रार दिली आहे. या वक्तव्याचा सलमान खानशी काहीही संबंध नसून त्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी खोडसाळपणे ही पोस्ट पसरविण्यात येत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल झाला नसला तरी या प्रकरणाची गुन्हे शाखा चौकशी करत आहे.