मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडून एकाच्या मृत्यूस व चौघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेल्या अभिनेता सलमान खान याला मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी कारागृहात जाण्यापासून मोठा दिलासा दिला. सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात सलमानने केलेले अपील उच्च न्यायालयाने दाखल करून घेत त्याची शिक्षा निलंबित केली व अपील निकाली लागेपर्यंत सशर्त जामीनही मंजूर केला. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर निश्चित झालेला सलमान लागलीच वांद्रे येथील निवासस्थानाहून शरणागती पत्करण्यासाठी आणि नव्याने जामीन घेण्यासाठी सत्र न्यायालयाच्या दिशेने रवाना झाला. सायंकाळी जामिनाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तो पुन्हा घरी परतला.
न्यायालय सलमानच्या अपिलावर तातडीने म्हणजे १५ जूनला सुनावणी घेणार असून जुलै महिन्यात अपिलावरील अंतिम सुनावणीही होणार आहे. बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी सलमानला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासह सर्वच आरोपांमध्ये दोषी ठरवत पाच वर्षांची सक्तमजुरी ठोठावली. त्यानंतर सलमानने लगेच उच्च न्यायालयात धाव घेत निकालाविरोधात अपील करीत अंतरिम दिलासा मागितला होता. निकालाची प्रत सलमानला न मिळाल्याच्या कारणास्तव न्यायालयानेही त्याला दोन दिवसांचा हंगामी जामीन मंजूर करून शुक्रवारी सुनावणी ठेवली होती. न्या. अभय ठिपसे यांच्यासमोर शुक्रवारी सुनावणी झाली. त्या वेळेस सलमानच्या वतीने अ‍ॅड्. अमित देसाई यांनी सलमानला सत्र न्यायालयाने दिलेली शिक्षा निलंबित करण्याची आणि सलमानला नियमित जामीन मंजूर करण्याची विनंती केली. याला मात्र सरकारी वकील संदीप शिंदे यांनी कडाडून विरोध केला. परंतु आरोपीचे अपील दाखल करून घेण्यात आले आणि आरोपीला सात वर्षांपर्यंतची शिक्षा झाली असेल तर त्याचा निकाल नियमानुसार उच्च न्यायालयाकडून निलंबित केला जातो. शिवाय अपील निकाली निघेपर्यंत आरोपीला जामीनही मंजूर केला जातो. त्यामुळे या प्रकरणीही सलमानच्या सामाजिक स्थानामुळे त्याला या अधिकारापासून वंचित ठेवणे योग्य वाटत नसल्याचे आणि कायदा हा सगळ्यांसाठी समान असल्याचे स्पष्ट करत न्यायमूर्ती ठिपसे यांनी सलमानची शिक्षा निलंबित केली. तसेच अपील निकाली निघेपर्यंत सलमानला ३० हजार रुपयांचा जामीनही मंजूर केला.
कमाल खानचे काय?
सलमानचा मित्र आणि गायक कमाल खान त्या वेळेस गाडीत होता आणि त्याचा जबाबही नोंदविण्यात आला होता. तो ब्रिटिश नागरिक असला आणि तेथे वास्तव्यास असला तरी त्याच्यासारख्या महत्त्वाच्या साक्षीदाराला साक्षीसाठी आणणण्याचा प्रयत्न का केला गेला नाही, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.
आरोपाच्या कलमांचा फेरविचार
शिवाय अनेक मुद्दे आहेत जे अपिलाच्या सुनावणीदरम्यान विचारात घेतले जाणार आहेत. त्यात सलमान गाडी चालवत होता की नाही तसेच त्याच्यावर भारतीय दंडविधानाच्या ३०४ (२) अन्वये सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवावा की कलम ३०४ (अ) अन्वये निष्काळजीपणे एखाद्याच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याचा आरोप ठेवावा, याचाही प्रामुख्याने विचार करण्याची गरज आहे. या दोन्ही आरोपांमध्ये कृत्याचे जाणीव हा मुद्दा महत्त्वाचा असून तो विचारात घेतला जाणार आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

उच्च न्यायालयाचे म्हणणे..
* सलमान हा सेलिब्रेटी आहे म्हणून त्याचे प्रकरण विशेष आहे असे म्हणता येणार नाही आणि त्याचमुळे अन्य सर्वसाधारण दोषी आरोपींप्रमाणे त्यालाही जामीन नाकारता येऊ शकत नाही.
* अपील ऐकून घेऊन निकाल देईपर्यंत सलमानला तुरुंगात ठेवावे असे याप्रकरणी तरी वाटत नाही. सदोष मनुष्यवधासारखा गंभीर आरोप असतानाही संपूर्ण खटल्यादरम्यान सलमान जामिनावर बाहेर होता. त्यामुळे आता शिक्षा झाल्यानंतर आणि त्यातही नियमानुसार त्याचे अपील दाखल करून घेत त्याच्याबाबतचा निकाल निलंबित केला जात असताना त्याला तुरुंगात ठेवण्याचा हट्ट का?  
* शिक्षा झालेल्या प्रत्येकाला कारागृहात जाणे कसे टळेल याबाबत अस्वस्थता असतेच. परंतु हे टाळण्यासाठीची साधने ज्यांच्याकडे नसतात, त्यांना दुर्दैवाने कारागृहात जाणे टाळणे शक्य नसते. परंतु ज्यांच्याकडे ही साधने उपलब्ध आहेत त्यांना ते शक्य आहे. त्यांनी त्यानंतरही त्याचा त्रास का सहन करावा? कायदा हा सगळ्यांसाठी समान आहे. त्यामुळे एखाद्याच्या सामाजिक स्थानावरून त्याच्यावर अन्याय करणे योग्य होणार नाही!
*****
१३ वर्षांनंतर खटल्याचा निकाल लागून सलमानला शिक्षा होते आणि त्यानंतर लगेच त्याला दोन दिवसांत जामीन मिळतो. अशा बाबी या कायद्याच्या कक्षेत बसविल्या जात असल्या तरी लोकांमध्ये मात्र कायद्याबाबत शंका निर्माण करणाऱ्या आहेत.
– एम. एन. सिंग, माजी पोलीस महासंचालक
*****
ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना न्याय आपल्या बाजूने मिळवणे कठीण नाही, हेच पुन्हा सिद्ध झाले आहे. खटल्याला लागलेला विलंब आणि पुन्हा शिक्षा  स्थगित होणे, या बाबी नक्कीच सामान्यांमध्ये शंका निर्माण करणाऱ्या आहेत.  
– जे. एफ. रिबेरो, माजी पोलीस महासंचालक
*****
सलमानला शिक्षा झाली तेव्हा कायद्याचे राज्य असल्याची खात्री पटली. परंतु शिक्षेला स्थगिती मिळाली असून अपील कधी निकालात निघेल याची कल्पना नाही, अशा वेळी कायद्याबाबत सामान्यांच्या मनात शंका निर्माण होत असते.  
– डॉ. सत्यपाल सिंग, माजी पोलीस आयुक्त आणि खासदार