मद्यधुंदावस्थेत गाडी चालवून पाच जणांना चिरडल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान याच्यावर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली खटला चालविण्याच्या निर्णयाबाबत सलमानने अर्ज सत्र न्यायालयात करावा की उच्च न्यायालयात यावर बुधवारच्या सुनावणीत खल झाला. शुक्रवारी या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.
वांद्रे महानगरदंडाधिकाऱ्यांनी सलमानवर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली खटला चालविण्यास परवानगी दिली होती. हा आरोप गंभीर असल्याने हे प्रकरण सत्र न्यायालयाकडे वर्ग केले होते. याविरोधात सलमानने सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. सलमानवरील नव्या आरोपाच्या खटल्याची सुनावणी ११ मार्च रोजी सत्र न्यायालयात होणार आहे. एवढी वर्षे आपल्याविरुद्धच्या खटल्यात साक्षीदार तपासले गेले तेव्हा सदोष मनुष्यवधाचा आरोप लावण्याबाबत काहीच निर्णय झाला नाही. परंतु प्रसिद्धीमाध्यमांनी या प्रकरणी आवाज उठविल्यानंतर अचानक आपल्यावर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली खटला चालविण्यास परवानगी दिली गेल्याचा आरोप करीत सलमानने हा आरोप रद्द करण्याची मागणी केली आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एन. पाटील यांच्यापुढे सलमानच्या अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी शुक्रवापर्यंत तहकूब केली आहे.