काळवीट शिकार प्रकरण

वीस वर्षांपूर्वी दोन काळवीटांची शिकार केल्याच्या प्रकरणात बॉलीवूडचा अभिनेता सलमान खान आरोपी असलेल्या खटल्याचा निकाल जोधपूरचे न्यायालय आज, गुरुवारी सुनावणार असून त्यासाठी सलमानसह इतर अभिनेते मंगळवारी येथे येऊन पोहचले. त्यामुळे सलमान खानसह शिकारीच्या घटनास्थळी उपस्थित असलेल्या सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांच्याबाबतही आज निकाल लागणार आहे.

‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जोधपूरनजीकच्या कनकनी खेडय़ातील भगोडा की धानी येथे १-२ ऑक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री दोन काळवीटांची शिकार केल्याचा सलमान खानवर आरोप आहे. तो सिद्ध झाल्यास त्याला सहा वर्षांच्या कैदेची शिक्षा होऊ शकते. त्या रात्री सर्व आरोपी एका जिप्सी कारमध्ये होते आणि सलमान ती चालवत होता. काळवीटांचा एक कळप दिसताच सलमाने गोळ्या झाडून त्यांपैकी दोघांना ठार मारले, असे सरकारी वकील भवानी सिंह भाटी यांनी सांगितले होते. मात्र हे लोक नजरेला पडल्याने त्यांचा पाठलाग केला असता, मृत काळवीटांना तेथेच टाकून ते पळून गेले. या घटनेबाबत त्यांच्याविरुद्ध पुरेसा पुरावा आहे, असेही त्यांचे म्हणणे होते. अभियोजन पक्षाच्या कथनात अनेक त्रुटी असून, या प्रकरणातील आरोप संशयातीतरीत्या सिद्ध करण्यात तो अपयशी ठरला असल्याचे सांगून सलमानचे वकील एच.एम. सारस्वत यांनी हे आरोप नाकारले होते.

कनिष्ठ न्यायालयात अंतिम युक्तिवाद २८ मार्चला संपल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी देव कुमार खत्री यांनी निकाल ५ एप्रिलपर्यंत राखून ठेवला होता. ५२ वर्षांचा सलमान खान मुंबईहून चार्टर्ड विमानातून येथे आला. त्यापूर्वी तो ‘रेस ३’च्या चित्रीकरणासाठी अबू धाबी येथे होता. सोनाली, सैफ, तब्बू व नीलम हेही मुंबईहून जोधपूरला पोहचले.

प्रकरण काय?

हम साथ साथ हैं या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे राजस्थानला गेले होते. त्यावेळी त्यांनी शिकार केली. काळवीटाच्या हत्येवर स्थानिक बिष्णोई समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सलमान खान आणि अन्य सहकलाकारांविरोधात गुन्हा दाखल झाला. सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली आरोप असून त्यासाठी कमाल ६ वर्षे कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे.