सत्र न्यायालयाचा निकाल १० जून रोजी

सलमान खानवर दहा वर्षांपूर्वीच्या ‘हिट अ‍ॅण्ड रन’प्रकरणी नव्याने ठेवण्यात आलेल्या सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली खटला चालवावा की नाही याबाबत १० जून रोजी सत्र न्यायालय आपला निर्णय देणार आहे.

दहा वर्षांनंतर सलमानवर सदोष मनुष्यवधाचा नवा आरोप ठेवण्यास आणि त्यानुसार त्याच्यावर खटला चालविण्यास हिरवा कंदील दाखवत वांद्रे महानगरदंडाधिकाऱ्यांनी प्रकरण सुनावणीसाठी सत्र न्यायालयाकडे वर्ग केले होते. परंतु न्यायालयाने दिलेला निर्णय चुकीचा असल्याचा दावा करीत सलमानने त्याविरोधात सत्र न्यायालयात अपील केले होते. आपल्यावर आतापर्यंत मद्यधुंद अवस्थेत निष्काळजीपणे गाडी चालवून एकाच्या मृत्यूस आणि काहीजणांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाअंतर्गत खटला चालविण्यात आला. त्यानंतर अचानक आपल्यावर नव्याने सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवून त्याअंतर्गत खटला चालविण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आला. एवढी वर्षे न्यायालयाने हा आरोप आपल्यावर का ठेवला नाही, असा सवालही सलमानने केला आहे. सलमानच्या अपिलावरील युक्तिवाद बुधवारी संपल्यानंतर न्यायालयाने त्यावरील निर्णय १० जूनपर्यंत राखून ठेवला. सलमान बुधवारच्या सुनावणीला हजर नव्हता.