मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून पदपथावर झोपलेल्या लोकांना चिरडणारा अभिनेता सलमान खान याच्याविरुद्ध महानगर दंडाधिकाऱ्यांनी नव्याने सदोष मनुष्यवधाचा आरोप लावून त्याच्याविरुद्धचा खटला पुन्हा सुनावणीसाठी सत्र न्यायालयाकडे वर्ग केला आहे. त्याची सोमवार, ११ मार्चपासून सुनावणी सुरू होणार आहे, परंतु महानगर दंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाला सलमानने सत्र न्यायालयातच आव्हान दिले असून ही फेरसुनावणी आणि अपिलावरील सुनावणी एकत्र घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सोमवारी तो न्यायालयात हजर राहणार की गैरहजर राहण्याची मुभा मागणार हे सोमवारीच ठरणार आहे.
सलमानच्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली असता अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी त्याची फेरसुनावणी आणि अपिलाची सुनावणी एकत्र करण्याचा अर्ज प्रधान न्यायाधीशांकडे पाठविणार असल्याचे म्हटले. त्यामुळे सोमवारी सलमानच्या अर्जावर प्रधान न्यायाधीशांसमोर सुनावणी होणार की अन्य दुसऱ्या न्यायालयाकडे प्रकरण वर्ग केले जाणार हेही ठरणार आहे, परंतु सलमानने अद्यापपर्यंत सोमवारपासून होणाऱ्या फेरसुनावणीसाठी गैरहजर राहण्याची मुभा मागितलेली नाही. म्हणूनच सोमवारी तो न्यायालयात हजर राहणार की गैरहजर राहण्याची मुभा मागणार हेही त्याच वेळी ठरणार आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सलमानच्या अर्जावर सत्र न्यायालय की उच्च न्यायालयात सुनावणी व्हायला हवी यावरून वाद सुरू होता. अखेर शुक्रवारी सत्र न्यायाधीशांनी त्याचा अर्ज दाखल करून घेत तो प्रधान न्यायाधीशांकडे पाठविला.