मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन याच्या शिक्षेसंदर्भात वादग्रस्त ‘ट्विप्पणी’ केल्याने अभिनेता सलमान खान याच्याविरोधात वातावरण पेटले आहे. त्यामुळे संभाव्य धोके लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी वांद्रे येथील सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.
शनिवारी रात्री अभिनेता सलमान खानने आपल्या ट्विटरवरून बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमनच्या समर्थनार्थ १४ ट्वीट केले होते. भारतीय न्यायव्यवस्थेबाबतही त्याने टिप्पणी केली होती. त्याच्या तीव्र प्रतिक्रिया सकाळपासून उमटायला लागल्या. राज्यभरात सलमान खानविरोधात निदर्शने होऊ लागली. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्याच्या घराबाहेर सकाळपासूनच बंदोबस्त वाढवला होता. सलमान वांद्रे बॅण्डस्टँड येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. वांद्रे पोलिसांनी सकाळपासून त्याच्या घराबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवला होता. या पोलीस बंदोबस्ताचा फटका त्याच्या घराबाहेर जमणाऱ्या त्याच्या चाहत्यांनाही बसला. या वादाच्या पाश्र्वभूमीवर सलमानच्या घराबाहेर बंदोबस्त ठेवला आहे. याशिवाय सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट वा अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर सेलच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे, असे मुंबई पोलिसांचे प्रवक्ते आणि पोलीस उपायुक्त डॉ. धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.