नफा कमी झाल्याने व्यवसाय अडचणीत

मीठ विकत घेणारया कंपन्यांकडून मिळणारा कमी भाव आणि दिवसेंदिवस मीठाच्या उत्पादनात होणारी घट, यामुळे सध्या मीठ व्यवसाय मोठय़ा तोटय़ात आहे. केवळ पारंपारिक व्यवसाय असल्याने अनेकजण सध्या हा व्यवसाय करत आहेत. मात्र यामधून उत्पन्नच मिळत नसल्याने आणि भविष्यात मीठागराच्या जागा सरकार ताब्यात घेण्याची भीती असल्याने तरुण पिढीने तर या व्यवसायाकडे पुर्णपणे पाठ फिरवली आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांनंतर मीठ आयात करण्याची वेळ राज्य शासनावर येणार आहे.

मीठ हा रोजच्या आहारातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात मीठ उत्पादनात मोठी घट झाल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. वसई, विरार पाठोपाठ, वडाळा, मानखुर्द परिसरात देखील अनेक मीठागरे आहेत. मीठाचा व्यवसाय करणारे व्यवसायीक मीठागराची जागा वर्षभरासाठी भाडय़ाने घेऊन यामध्ये मीठाचे उत्पादन घेतात. मात्र गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर वर्षभरात केवळ २० ते २५ टक्केच नफा मिळत असल्याने त्यांना हा व्यवसाय आता नकोशी वाटू लागला आहे. त्यातच मीठागरांच्या जागा गृहनिर्माणाकरिता देण्याचे राज्य सरकारचे धोरण असल्याने त्याही हातातून जाण्याची भीती आहे. त्यामुळे नवीन पिढी या व्यवसायाकडे पाठ फिरवू लागली आहे.

वसई येथे राहणारे सिताराम पटेल यांचा गेल्या तीन पिढीपासून मीठ उत्पादनाचाच व्यवसाय आहे. सध्या त्यांचे वडील वडाळा येथे मिठाची शेती करत आहेत. तर ते  वाशी खाडीलगत मीठाचे उत्पादन घेत आहेत. मात्र मीठागरामध्ये काम करण्यासाठी त्यांना मजूर देखील वेळेवर मिळत नसल्याने कधी—कधी स्वत:च ते मीठागरात उतरुन काम करतात. सिताराम यांना दोन भाऊदेखील आहेत. मात्र ते उच्चशिक्षित असल्याने त्यांनी हा पारंपारिक व्यवसाय सोडून नोकरी धरली आहे. तर त्यांच्या मुलांनी या व्यवसायाकडे कधीच पाठ फिरवली आहे. मात्र पारंपारिक व्यवसाय असल्याने मी हा व्यवसाय करत असल्याचे सिताराम यांनी सांगितले आहे.

मजुरांवर मोठा खर्च

मीठागरे ही मुख्य रस्त्यांपासून बरयाच अंतरांवर असल्याने याठिकाणी वीज—पाणी तसेच रस्त्यांची देखील सोय नाही. त्यामुळे अशा ठिकाणी काम करण्यासाठी मजूर देखील मिळत नाही. केवळ चार महिन्याचे काम असताना मजूरांना वर्षभर आगोदर आगाऊ  मजूरी द्यावी लागते.शिवाय चार महिने त्यांचा सर्व खर्चदेखील करावा लागतो. त्यामुळे उत्पनातून मिळणारी बरीच रक्कम मजूरीवरच खर्च होते. तर कधी मजूर अर्धवट काम सोडूनदेखील जात असल्याने मोठा तोटा सहन करावा लागतो.

अतिक्रमण, प्रदूषणाचा  परिणाम

गेल्या काही वर्षांमध्ये खाडीलगतदेखील मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. शिवाय शहरातील सांडपाणी समुद्र किनारी सोडण्यात येत असल्याने मीठ उत्पादनावर याचा मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे शासनाने आमच्यादेखील पोटा पाण्याचा विचार करावा अशी प्रतिक्रिया राम वैती या व्यावसायिकाने केली आहे.

दलालांकडून योग्य भाव नाही

दिवाळी संपातच मीठ उत्पादक खाडीलागतची जागा भाडय़ाने घेतात. यासाठी त्यांना जागेसाठी लाख रुपये भाडे द्यवे लागते. त्यानंतर चार महिने काम करणारया मजूरांला दिवसाचे २४० रुपये मजूरी, शिवाय त्यांना लागणारे धान्य आणि इतर सामान मिळून दोन ते अडीच लाख रुपये खर्च होतो. मात्र अनेकदा मीठाला भाव कमी मिळत असल्याने तोटादेखील सहन करावा लागतो. सध्या मीठाला भाव अठराशे रुपये टन इतका आहे.मात्र मागच्या वर्षी हाच दर हजार रुपये होता. त्यामुळे मागच्या वर्षी खर्च वगळता काहीही कमाई झाली नसल्याची माहिती सिताराम पटेल यांनी दिली आहे.

आदिवासी मजुरांची संख्या अधिक

पूर्वी गावा खेडय़ात राहणारे मजूर सहज उपलब्द होत होते. मात्र मीठ व्यवसायात केवळ चार महिनेच काम असल्याने इतर आठ महिने त्यांचे मोठे नुकसान व्हायचे.  त्यामुळे पालघर, डहाणू या परिसरातील अदीवासी मजूरांना शोधून त्यांना या कामावर ठेवावे लागते. पावसाळयात ते शेतीची कामे करत असल्याने पावसाळा संपल्यानंतर ते याठिकाणी कामासाठी येतात. मात्र पावसाळा सुरु होताच ते पुन्हा आपल्या घरी जाउन पुन्हा शेतीची कामे सुरु करतात.