24 September 2020

News Flash

पिढीजात मीठ व्यवसायाकडे तरुणांची पाठ

पिढय़ानपिढय़ा करण्यात येत असल्याच्या कारणास्तव आजही काही कुटुंबे हा व्यवसाय करत आहेत.

मिठागरांच्या जागा ताब्यात घेण्याच्या भीतीमुळे या कुटुंबांतील तरुणवर्ग मीठ व्यवसायाकडे दुर्लक्ष करू लागला आहे

नफा नसल्याने व्यवसायाकडे दुर्लक्ष; सरकार मिठागरे ताब्यात घेण्याचीही भीती

मीठ विकत घेणाऱ्या कंपन्यांकडून मिळणारा कमी भाव आणि दिवसेंदिवस उत्पादनात होत असलेली घट यांमुळे एकेकाळी मुंबई-ठाणे पट्टय़ातील मुख्य व्यवसाय असलेला मीठ व्यवसाय सध्या नामशेष होण्याची चिन्हे आहेत. पिढय़ानपिढय़ा करण्यात येत असल्याच्या कारणास्तव आजही काही कुटुंबे हा व्यवसाय करत आहेत. मात्र, त्यात नफ्यापेक्षा तोटा अधिक असल्याने आणि भविष्यात सरकारने मिठागरांच्या जागा ताब्यात घेण्याच्या भीतीमुळे या कुटुंबांतील तरुणवर्ग मीठ व्यवसायाकडे दुर्लक्ष करू लागला आहे. त्यामुळे मुंबईतील मीठ व्यवसाय जवळपास संपुष्टात येण्याची भीती आहे.

मुंबई, ठाणे, वसई-विरार, पालघर या समुद्र तसेच खाडीकिनारा लाभलेल्या परिसरात मीठ व्यवसाय हा एकेकाळी महत्त्वाचा व्यवसाय मानला जात होता. आजही वडाळा, भांडुप, विक्रोळी, मानखुर्द, वसई, विरार या भागांत मिठागरे पाहायला मिळतात. मात्र, गेल्या काही वर्षांत या व्यवसायाला घरघर लागली आहे. मिठागराची जागा वर्षभरासाठी भाडय़ाने घेऊन तेथे मिठाचे उत्पादन घेतले जाते. मात्र, गुंतवणूक केलेल्या रकमेवर वर्षभरात केवळ २० ते २५ टक्केच नफा मिळत असल्याने अनेकांनी आता या व्यवसायाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यातच मुंबईतील घरांची वाढती मागणी पूर्ण करण्याकरिता मिठागरांच्या जमिनी खुल्या करण्याचे धोरण राज्य सरकारने आखल्याने या व्यवसायाबाबत अस्थिरतेचे वातावरण आहे.

वसई येथे राहणारे सीताराम पटेल यांचा गेल्या तीन पिढय़ांपासून मीठ उत्पादनाचाच व्यवसाय आहे. सध्या त्यांचे वडील वडाळा येथे मिठाची शेती करत आहेत. तर ते वाशी खाडीलगत मिठाचे उत्पादन घेत आहेत. मात्र मिठागरामध्ये काम करण्यासाठी त्यांना मजूर देखील वेळेवर मिळत नसल्याने कधी-कधी स्वत:च ते मिठागरात उतरून काम करतात. सीताराम यांना दोन भाऊदेखील आहेत. मात्र ते उच्चशिक्षित असल्याने त्यांनी हा पारंपरिक व्यवसाय सोडून नोकरी धरली आहे. तर त्यांच्या मुलांनी या व्यवसायाकडे कधीच पाठ फिरवली आहे.

दलालांकडून योग्य भाव नाही

दिवाळी संपताच मीठ उत्पादक खाडीलगतची जागा भाडय़ाने घेतात. यासाठी त्यांना जागेसाठी लाख रुपये भाडे द्यावे लागते. त्यानंतर चार महिने काम करणाऱ्या मजुराला दिवसाचे २४० रुपये मजुरी, शिवाय त्यांना लागणारे धान्य आणि इतर सामान मिळून दोन ते अडीच लाख रुपये खर्च होतो. मात्र अनेकदा मिठाला भाव कमी मिळत असल्याने तोटादेखील सहन करावा लागतो. सध्या मिठाला भाव अठराशे रुपये टन इतका आहे. मात्र मागच्या वर्षी हाच दर हजार रुपये होता. त्यामुळे मागच्या वर्षी खर्च वगळता काहीही कमाई झाली नसल्याची माहिती सीताराम पटेल यांनी दिली.

मजुरांवरच अधिक खर्च

मिठागरे ही मुख्य रस्त्यांपासून बऱ्याच अंतरावर असल्याने या ठिकाणी वीज-पाणी तसेच रस्त्यांची देखील सोय नाही. त्यामुळे अशा ठिकाणी काम करण्यासाठी मजूर देखील मिळत नाही. केवळ चार महिन्यांचे काम असताना मजुरांना वर्षभर आधी आगाऊ  मजुरी द्यावी लागते. शिवाय चार महिने त्यांचा सर्व खर्चदेखील करावा लागतो. त्यामुळे उत्पन्नातून मिळणारी बरीच रक्कम मजुरीवरच खर्च होते.

गेल्या काही वर्षांमध्ये खाडीलगतदेखील मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. शिवाय शहरातील सांडपाणी समुद्रकिनारी सोडण्यात येत असल्याने मीठ उत्पादनावर याचा मोठा परिणाम होत आहे.

– राम वैती, मीठ व्यावसायिक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 2:46 am

Web Title: salt pans of mumbai and thane belt may disappear soon
Next Stories
1 रेल्वेच्या जमिनींचे खासगीकरण?
2 बॉलीवूडला दुचाकी पुरवणारे प्रत्यक्षात बाइकचोर
3 ९५० सोसायटय़ांना न्यायालयात खेचणार
Just Now!
X