वेगवेगळ्या ब्रीडचे श्वान पाळण्याची लोकप्रियता अलीकडच्या काळात वाढली असली तरी काही श्वानांच्या उत्पत्तीचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे. हाउंड प्रकारात मोडणारे सालुकी श्वानांनाही फार प्राचीन इतिहास आहे. जगातील सर्वात जुने श्वान ब्रीड अशी या श्वानांची ओळख आहे. तब्बल सहा हजार वर्षांपूर्वी या श्वानाची उत्पत्ती झाली. सर्वात प्रथम इराणच्या एका लेखकाने ११२१ ते ११३०च्या दरम्यान सालुकी श्वानांबद्दल लिहिल्याची नोंद आढळते. मूळचे अरब देशातील हे ब्रीड राखणदार आणि शेतीसाठी वापरले जाते. पूर्वी घरांची व्यवस्था नसताना नागरिक तंबूमध्ये राहत. तेव्हापासून सालुकी श्वान पाळले जातात. या श्वानांचा प्रसार जलद झाला असला तरी मूळच्या अरब देशातून या श्वानांचा प्रसार व्हायला सुरुवात झाली. १५०० ते १८००च्या दरम्यान युद्ध सुरू असताना परदेशी व्यापारी अरब देशात आल्यावर या व्यापाऱ्यांनी हे श्वान परदेशात न्यायला सुरुवात केली. पहिल्यांदा १८४० मध्ये पर्शिया, इमेन अशा देशातून हे श्वान परदेशात नेण्यात आले. इजिप्त हे या श्वानांचे उगमस्थान मानले जाते. इजिप्तप्रमाणे इराण, जॉर्डन तसेच चीनमध्ये या श्वानांचे वास्तव्य आढळले. श्वानांच्या शर्यतीच्या स्पर्धामध्ये हे श्वान नेहमी अग्रेसर असतात. ताशी ६८ किलोमीटर धावण्याचे या श्वानांचे वैशिष्टय़ वाखणण्याजोगे आहे. हजारो वर्षांपूर्वी चित्रकारांनी काढलेल्या चित्रात सालुकी श्वानांच्या चित्रांचा समावेश आढळतो. धावण्याच्या स्पर्धेत १९६० मध्ये ग्रे हाउंड या श्वानांचा रेकॉर्ड सालुकी श्वानांनी मोडला. भारतात सालुकी फार जास्त प्रमाणात पाहायला मिळत नाहीत. मात्र भारतात या श्वानांचे ब्रीडिंग होते. डीना टाल्बोट, दी कृष्णमूर्ती, नागराज शेट्टी यांनी परदेशातून हे श्वान भारतात आणले आणि या श्वानांचे ब्रीडिंग करण्यास सुरुवात केली. मुळात सालुकी श्वान जगातील अत्यंत जुने श्वान ब्रीड असल्याने या श्वानांची शारीरिक ठेवण इतर श्वानांपेक्षा वेगळी आहे. राखणदारी आणि शिकारी हा या श्वानांचा मुख्य पेशा म्हणता येईल. त्यासाठी या श्वानांच्या दातांची ठेवणही तशाच प्रकारची पाहायला मिळते. २८ ते ३० इंच उंची असलेल्या या श्वानांचे डोळे बदामाच्या आकारासारखे भासतात. सालुकी श्वानांच्या कानावर लांब केस असतात.

नजर तीक्ष्ण, लांबची शिकार पकडण्याचे कसब

हाउंड श्वान ज्या वैशिष्टय़ासाठी ओळखले जातात ते म्हणजे नजरेची तीक्ष्णता. त्यामुळे लांबवरची शिकार पकडण्याचे कसब या श्वानांमध्ये असते. यासाठी शेत-शिवारात, मोठे बंगले यांच्या रक्षणासाठी सालुकी श्वानांचा उपयोग असतो.

व्यायामाची पूर्तता, मानसिक समाधान

सालुकी श्वानांना योग्य समतोल आहार आणि व्यायामाची पूर्तता या श्वानांना मिळाल्यास या श्वानांचे मानसिक संतुलन योग्य राहते. शाकाहारी आहारापेक्षा मांसाहारी आहार या श्वानांसाठी उपयुक्त ठरतो. शर्यतीत धावण्याची सवय असल्याने प्रथिनयुक्त पौष्टिक आहार या श्वानांची गरज असते. घरात पाळत असल्यास मोकळ्या जागेत या श्वानांना फिरायला नेणे हे काम मालकाने नित्याने करणे गरजेचे असते.

प्रशिक्षण देताना काळजी आवश्यक

इतर श्वानांना आज्ञेचे पालन करण्याचे प्रशिक्षण ज्याप्रमाणे दिले जाते तसे सालुकी श्वानांना देणे योग्य ठरत नाही. सालुकी श्वानांच्या स्वभावाची दखल घेत प्रशिक्षण देणे योग्य ठरते. बळजबरीने प्रशिक्षण या श्वानांना दिल्यास या श्वानांचे मानसिक स्वास्थ्य बिघडते.