ऑपरेशन करताना मुस्लिम व्यक्तीच्या दाढीला हात लावू नका अशी अजब मागणी मुंबई महापालिकेत करण्यात आली आहे. समाजवादी पक्षाचे नगरसेवक रईस शेख यांनी अतिरिक्त आयुक्तांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. रुग्णालयात मुस्लिम रुग्णांवर शस्त्रक्रिया करताना संबंधित रुग्णाच्या कुटुंबीयांची संमती घेऊनच त्याची दाढी काढावी असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. शेख यांच्या अजब मागणीमुळे वादाला तोंड फुटलं आहे.

मुस्लिम धर्मीयांमध्ये दाढी ठेवण्याची प्रथा आहे. काहीजण ही प्रथा मानतात काही मानत नाहीत. मात्र सपा नगरसेवकाच्या अजब मागणीमुळे वाद निर्माण होणार असेच चित्र आहेत. रईस शेख हे भायखळ्यातून समाजवादी पक्षाचे नगरसेवक आहेत.

रईस शेख यांनी लिहिलेले पत्र 

काय म्हटले आहे पत्रात?
मुस्लिम समाजात दाढीला महत्त्व असून मुस्लिम समाजातील सर्वच पुरुष आणि धर्मगुरुदेखील दाढी ठेवतात. दाढी ठेवणे ही मुस्लिम समाजाची धार्मिक परंपरा आहे. मात्र महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये छोटीशी शस्त्रक्रिया करायची असेल तरीही रुग्णाच्या संपूर्ण चेहऱ्यावरचे केस काढण्यात येतात. चेहऱ्यावरची दाढी काढणे मुस्लिम धर्माच्या विरोधात असल्याने रुग्णाला आणि त्याच्या कुटुंबीयांना समाजात वावरताना त्रास सहन करावा लागतो. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन आवश्यकता असेल तरच दाढी काढावी, दाढी न काढता शस्त्रक्रिया शक्य असेल तर तशी ती करावी. पत्राद्वारे माझी अशी मागणी आहे की रुग्णाची दाढी काढायची असेल तर कुटुंबीयांची परवानगी घेऊनच दाढी काढली जावी.