नंदूरबार या पारंपरिक मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात काम केलेल्या आमदाराला पक्षात प्रवेश देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:ची ताकद वाढविताना काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
राज्याच्या स्थापनेपासून नंदूरबार लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत काँग्रेसचा कधीच पराभव झाला नव्हता. यंदा मात्र भाजपच्या हिना गावित यांनी काँग्रेसचा पराभव केला. माजी मंत्री विजयकुमार गावित यांनी मुलीला भाजपमधून उभे केल्याने राष्ट्रवादीने त्यांच्या विरोधात कारवाई केली. असे असले तरी तेव्हा पुतणीच्या प्रचाराचे काम केलेले नवापूरचे समाजवादी पक्षाचे आमदार शरद गावित यांना सोमवारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देण्यात आला. काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या नवापूरमधून शरद गावित यांना उमेदवारी दिली जाईल, असे तटकरे यांनी जाहीर केले. लोकसभा निवडणुकीत नंदूरबारमधील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघांत  हिना गावित यांना आघाडी मिळाली असली तरी नवापूरमध्ये काँग्रेसला १३ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत नवापूर मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडणार नाही, असे काँग्रेसचे प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले.