आता थेट कायदेशीर कारवाई

माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने अनेकांना मुले झाली, या वादग्रस्त विधानाबद्दल शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांना नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने बजावलेली कारणे दाखवा नोटीस परत आली आहे. भिडे यांनी ती नोटीस स्वीकारलेली नाही. परंतु गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्यातील तरतुदीनुसार भिडे यांच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. जयराम कोठारी यांनी लोकसत्ताला दिली.

नाशिक येथे १० जून २०१८ रोजी एका जाहीर सभेत संभाजी भिडे यांनी, माझ्या शेतातील आंबे १८०  पेक्षा जास्त लोकांना खायला दिले, त्यापैकी १५० जणांना मुले झाली, ज्यांना मुलगा हवा त्यांना मुलगाच होईल, असे विधान केले. या संदर्भात विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येणारी टीका आणि  सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी केलेल्या तक्रारीनुसार राज्याच्या आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी भिडे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करावी, अशा सूचना नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला दिल्या. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने १८ जून ला भिडे यांना त्यांच्या सांगली येथील पत्त्यावर कारणे दाखवा नोटीस पाठविली. त्यात भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गर्भलिंग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे.

नाशिक येथील जाहीर सभेत उल्लेख केलेली आंब्याची झाडे किती व कुठे आहेत, तसेच ज्या दांपत्यांना आपण सदर झाडांचे आंबे खायला दिल्याने मुलगा झाला,  त्यांची नावे व पत्ते याबाबतची  सविस्तर माहिती देण्यास भिडे यांना  सांगण्यात आले होते.  सात दिवसांच्या आत त्याबाबत खुलासा करावा, अन्यथा आपल्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे या नोटिशीत नमूद करण्यात आले होते.

या संदर्भात २७ जूनच्या लोकसत्तामध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर, संभाजी भिडे यांच्या वतीने शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी नोटीस अद्याप मिळालेली नाही, ती मिळाल्यांतर योग्य तो खुलासा करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. नोटीस बजावून पंधरा दिवस उलटून गेले, तरी भिडे यांच्याकडून उत्तर आले नाही.

या संदर्भात डॉ. कोठारी यांच्याशी संपर्क साधला असता, भिडे यांनी ती नोटीस स्वीकारली नाही, ती परत आली, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र त्यामुळे कारवाई थांबणार नाही. पीसीपीएनडीटी कायद्यातील तरतुदीनुसार महापालिकेच्या सल्लागार समितीची बैठक घेऊन त्यात हा विषय मांडला जाईल. समितीच्या संमतीनंतर भिडे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल, असे त्यांनी सांगितले.