News Flash

आंबा प्रकरणी नाशिक महापालिकेचा संभाजी भिडेंवर ठपका, खटला चालवणार

माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते असं अजब वक्तव्य करणारे श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत

(संग्रहित छायाचित्र)

माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते असं अजब वक्तव्य करणारे श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. प्रसूतीपूर्व लिंग निदान तंत्र अधिनियम समिती पीसीपीएनडीटीच्या प्राथमिक बैठकीत संभाजी भिडे दोषी आढळले होते. त्यामुळे पीसीपीएनडीटीच्या निर्देशानुसार  नाशिक महापालिकेने  गर्भधारणा व प्रसूती पूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) या कायद्यातील कलम २२ अंतर्गत भिडे यांना दोषी ठरवून त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेने भिडे यांना दोनवेळा नोटीस बजावली होती. त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली होती पण त्यावर भिडे यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही. त्यामुळे शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत भिडे यांनी कायद्याचे उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध होत असल्याने त्यांच्या विरुद्ध न्यायालयात खटला चालवण्याच निर्णय घेण्यात आला.

जून महिन्यात नाशिकमधील एका सभेत बोलताना संभाजी भिडे यांनी आपल्या शेतातील आंबे खाल्ल्याने जवळपास १५० जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावाही केला होता. “लग्न होऊन १५ वर्ष झालेल्यांनाही मुलं होतं नाहीत. अशा स्त्री, पुरुषांनी ही फळं खाल्ल्यास त्यांना निश्चित मुलं होतील. मी आतापर्यंत १८० हून जास्त जणांना, जोडप्यांना हे फळ खायला दिलं असून १५० पेक्षा जास्त जणांना मुलं झाली आहेत”, असं विधान संभाजी भिडे यांनी केलं होतं. विशेष म्हणजे ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल असाही दावा त्यांनी केला होता.

संभाजी भिडेंनी उल्लेख केलेला तो ‘वादग्रस्त आंबा’ सापडला
भिडे गुरूजींनी दावा केलेला पुत्रदा (कामदा) आंबा उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी येथे सापडला आहे. संघाचे प्रचारक म्हणून भिडे गुरूजी वाशी येथे वास्तव्यास होते. तेव्हा मायभाटे गुरूजी यांच्या शेतातील आंब्याची त्यांना माहिती झाली. तेव्हापासून ते आंब्याचे प्रचारक झाले असल्याचे मायभाटे यांचा मुलगा प्रदीप यांनी सांगितले. राज्यभरातून अनेकजण हा आंबा घेऊन जाण्यासाठी येतात आणि तो खाल्ल्यामुळे संतती प्राप्त होत असल्याचा दावाही भिडे गुरूजींप्रमाणेच प्रदीप यांनीही केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 8:33 pm

Web Title: sambhaji bhide mango claim child birth nashik corporation
Next Stories
1 शिर्डीतील द्वारकामाईत साईबाबांची प्रतिमा अवतरल्याचा व्हिडिओ व्हायरल
2 मुंबई हायकोर्टाचा दणका, थर्माकोलच्या मखरांवरील बंदी कायम
3 काळजी घ्या! हवामान विभागाचा वीकएण्डला मुसळधार पावसाचा इशारा
Just Now!
X