कल्याण तालुक्यातील बाळे गावामधील एका जमिनीचे दोन वेगवेगळ्या व्यक्तींशी व्यवहार करून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सुप्रसिद्ध लोढा डेव्हलपर्ससह १६ जणांविरोधात डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन १५ दिवस उलटले तरी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याने अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही, असे डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आर. एस. पवार यांनी सांगितले. कळवा परिसरातील निहाल तन्ना यांच्या कुटुंबियांनी १९८६ साली बाळे गावातील गायकर यांच्या मालकीची जमीन खरेदी केली होती. २००६ मध्ये त्यांनी या जमिनीच्या विकासाचे हक्क लोढा डेव्हलपर्स कंपनीला दिले होते. मात्र, आर्थिक व्यवहार पूर्ण झालेला नसताना जमिनीच्या सातबाऱ्यावर लोढाचे नाव लागले . दरम्यान, गायकर कुटुंबीयांकडून बाबाजी पाटील याने जमीन खरेदी केली. मात्र ती लोढा डेव्हलपर्सला विकल्याची माहिती तन्ना यांनी केलेल्या चौकशीतून समोर आली. जमिनीवरील गायकर यांचे मालकी संपुष्टात आले असतानाही जमिनीची बेकायदा विक्री केल्याचा तन्ना यांचा आरोप आहे. लोढा डेव्हलपर्स व तन्ना यांच्यात व्यवहार झालेला असतानाही लोढा डेव्हलपर्सने तीच जमीन पाटील यांच्याकडून पुन्हा खरेदी केली आहे. लोढा डेव्हलपर्सने एकच जमीन दोन व्यक्तींकडून कशासाठी खरेदी केली, असा सवाल तन्ना यांनी तक्रारीत उपस्थित केला आहे. तसेच त्या जमीनीचे बाजारमुल्य १ कोटी ६७ लाख रुपये असतानाही अवघ्या सात लाख २५ हजार रुपयात ती जमीन विकल्याचे लोढा व पाटील यांच्या करारपत्रात म्हटले आहे. त्यामुळे हा व्यवहार बोगस असल्याचा दावा तन्ना यांनी केला आहे. या प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दाद मागितल्यानंतर त्या सातबाऱ्यावर तन्ना यांचे नाव लागले आहे.