कामाचे ठिकाण, स्वरूप, वेळ इतकेच काय तर त्यात असलेली जोखीमही सारखीच असताना वेतन, भत्ते, सुट्टय़ा यांच्याबरोबरच स्थायी सुरक्षा रक्षकांच्या आणि आपल्या गणवेशातही फरक केला जात असल्याने, आता मुंबई विद्यापीठात हंगामी तत्त्वावर काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी आपला लढा बुलंद केला आहे.
या सुरक्षा रक्षकांच्या मागण्याही तशा साध्याच आहेत. विद्यापीठ दरबारी या मागण्यांना कायम हरताळ फासण्यात आला आहे. समान काम, समान वेतन, किमान वेतन कायद्यानुसार वेतन लागू करणे, भविष्यनिर्वाह निधी योजना लागू करणे, नैमित्तिक, वैद्यकीय रजा लागू करणे, गणवेशाचा खर्च मिळणे अशा मागण्यांकरिता या कर्मचाऱ्यांना विद्यापीठाच्या दाराशी बसण्याची वेळ आली आहे. यातली एक गणवेशासंबंधीची मागणी मान्य करणे विद्यापीठाला सहजशक्य आहे. परंतु त्यासाठीही या कर्मचाऱ्यांना वर्षांनुवर्षे तंगवण्याचे विद्यापीठाचे आतापर्यंतचे धोरण राहिले आहे. विद्यापीठात हंगामी तत्त्वावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना सफेद रंगाचा शर्ट, खाकी रंगाची पँट आणि निळ्या रंगाची टोपी असा गणवेश परिधान करणे बंधनकारक आहे. या उलट स्थायी कर्मचाऱ्यांना संपूर्ण खाकी रंगाचा गणवेश नेमून देण्यात आला आहे. त्यालाच कर्मचाऱ्यांचा आक्षेप आहे. ‘मुळात आम्ही स्थायी कर्मचाऱ्यांचेच काम करत असताना, त्यांच्याइतकीच जोखीम आम्हीही पत्करत असताना आमचा गणवेश वेगळा का, असा सुरक्षा रक्षकांचा सवाल आहे. गणवेशातील फरकामुळे आम्ही हंगामी तत्त्वावर काम करणारे कर्मचारी आहोत हे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर वरचेवर कामासाठी येणाऱ्यांनाही सहज ओळखता येते. त्यामुळे, कित्येकदा आम्हाला कस्पटासमान वागणूक दिली जाते. कर्तव्य बजावत असताना शिवीगाळही केली जाते,’ अशी तक्रार ‘मुंबई विद्यापीठ कामगार संघटने’चे अध्यक्ष मिलिंद तुळसकर यांनी केली.

हातेकर-पेठे समिती
वर्षांनुवर्षे हे सुरक्षा रक्षक विद्यापीठ प्रशासनाशी आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात भांडत आहेत. परंतु, त्यांची दखल विद्यापीठदरबारी घेतली न गेल्याने अखेर बुधवारी या सुरक्षा रक्षकांनी आंदोलनाचा इशारा विद्यापीठाला दिला. परंतु, कुलगुरूंनी हस्तक्षेप करून सुरक्षा रक्षकांचे प्रश्न ऐकून घेऊन त्यावर तोडगा काढण्याकरिता समिती नेमण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. प्राध्यापक नीरज हातेकर आणि प्राध्यापक अभय पेठे यांची समिती याकरिता विद्यापीठाने नेमली आहे.