महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या छगन भुजबळ यांचे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांना ८ फेब्रुवारीपर्यंत सक्तवसुली महासंचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावण्यात आली आहे. सोमवारी रात्री सक्तवसुली महासंचालनालयाकडून ९ तासांच्या चौकशीत विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर देण्यात समीर भुजबळ अपयशी ठरल्याने त्यांना अटक करण्यात आली. यानंतर मंगळवारी त्यांना विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.
दरम्यान त्याआधी समीर भुजबळ यांना वैद्यकीय तपासणीसाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले होते. समीर भुजबळ यांनी किरीट सोमय्या हे भुजबळ कुटुंबीयांविरुद्ध कारवाई करण्यासाठी ईडीवर दबाव आणत असल्याचा आरोप केला. आतापर्यंतच्या तपासात ईडीला संपूर्ण सहकार्य केल्याचेही ते म्हणाले.
सुमारे दहा वर्षांपूर्वी गाजलेल्या तेलगी घोटाळ्यात समीर भुजबळ यांचे नाव पुढे आले होते व त्यांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार होती. तेव्हा थोडक्यात बचावलेल्या समीर यांनी बांधकाम घोटाळ्यात मात्र तुरुंगाची हवा खावी लागली आहे. अब्दुल करीम तेलगीच्या मुद्रांक घोटाळ्यात महाराष्ट्र व कर्नाटकातील बडय़ा राजकारण्यांची नावे पुढे आली होती. तेलगी घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या विशेष चौकशी पथकाने माजी पोलीस आयुक्त रणजितसिंह शर्मा, सहआयुक्त श्रीधर वगळ यांच्यासह काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकले होते. तेव्हाही छगन भुजबळ आणि समीर या काका-पुतण्याची नावे या घोटाळ्यात पुढे आली होती. समीरच्या एका निकटवर्तीयाला अटक झाली होती. समीरच्या जवळच्या एका बडय़ा इंधनमाफियाविरोधात ‘मोक्का’न्वये कारवाई झाली होती. तेलगीकांडात समीर भुजबळ यांच्या विरोधात तेव्हा कारवाई केली जाणार अशी जोरदार चर्चा होती. त्या घोटाळ्यात काही बडय़ा धेंडांची नावे जशजशी पुढे येऊ लागली तसा चौकशीचा वेग मंदावत गेला. तेलगीच्या लाय डिटेक्टर चाचणीत काही नेत्यांची नावे आली आणि तपास खुंटत गेला. तेलगीला कर्नाटकातील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली आणि पुढे तेलगी प्रकरण थंड बस्त्यात गेले. राज ठाकरे, धनंजय यांनी काकांच्या विरोधात बंड करून वेगळी वाट धरली. भुजबळ यांनी मात्र पुतण्याच्या कलाने सारे घेतले.

भुजबळांचा राजकीय वारस
भुजबळ यांचे पुत्र पंकज हे आमदार असले तरी पुतणे समीर हे त्यांचे राजकीय वारस मानले जातात. सर्व निर्णय भुजबळ हे समीर यांच्याशी सल्लामसलत करून घेतात, असे बोलले जाते. गेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात समीर यांच्याऐवजी स्वत: भुजबळ यांनी निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मांडला असता तेव्हा नाशिकचे खासदार असलेल्या समीर यांना दुखविण्याची भुजबळ यांची इच्छा नव्हती. पण पक्षाच्या आदेशामुळे भुजबळ लढले होते. २००९च्या लोकसभा निवडणुकीत समीर हे नाशिक मतदारसंघातून विजयी झाले होते. समीर यांच्या विजयाचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून जुना राग बाजूला ठेवून भुजबळ हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. मनसेला रोखण्याकरिता शिवसेनेने समीर यांना मदत केल्याची चर्चा होती.