सुमारे दहा वर्षांपूर्वी गाजलेल्या तेलगी घोटाळ्यात समीर भुजबळ यांचे नाव पुढे आले होते व त्यांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार होती. तेव्हा थोडक्यात बचावलेल्या समीर यांनी बांधकाम घोटाळ्यात मात्र तुरुंगाची हवा खावी लागली आहे.
अब्दुल करीम तेलगीच्या मुद्रांक घोटाळ्यात महाराष्ट्र व कर्नाटकातील बडय़ा राजकारण्यांची नावे पुढे आली होती. तेलगी घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या विशेष चौकशी पथकाने माजी पोलीस आयुक्त रणजितसिंह शर्मा, सहआयुक्त श्रीधर वगळ यांच्यासह काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकले होते. तेव्हाही छगन भुजबळ आणि समीर या काका-पुतण्याची नावे या घोटाळ्यात पुढे आली होती. समीरच्या एका निकटवर्तीयाला अटक झाली होती. समीरच्या जवळच्या एका बडय़ा इंधनमाफियाच्या विरोधात ‘मोक्का’न्वये कारवाई झाली होती. तेलगीकांडात समीर भुजबळ यांच्या विरोधात तेव्हा कारवाई केली जाणार अशी जोरदार चर्चा होती. त्या घोटाळ्यात काही बडय़ा धेंडांची नावे जशजशी पुढे येऊ लागली तसा चौकशीचा वेग मंदावत गेला.
तेलगीच्या लाय डिटेक्टर चाचणीत काही नेत्यांची नावे आली आणि तपास खुंटत गेला. तेलगीला कर्नाटकातील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली आणि पुढे तेलगी प्रकरण थंड बस्त्यात गेले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय यांनी काकांच्या विरोधात बंड करून वेगळी वाट धरली होती. भुजबळ यांनी मात्र पुतण्याच्या कलाने सारे घेतले.