डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीपासूनच केंद्र व राज्य सरकारने समता या शब्दाऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित समरसता या शब्दाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. समरसता शब्दाला आंबेडकरवाद्यांचा विरोध आहे. १४ एप्रिल रोजी केंद्र सरकारने  प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींत सामाजिक समरसता असा शब्द वापरला आहे. तर राज्य शासनाने काढलेल्या एका शासन आदेशातही १४ एप्रिल हा राष्ट्रीय समरता दिवस म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

वर्णव्यवस्था व जातिव्यवस्थेमुळे विभाजित झालेल्या भारतीय समाजाची समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुभाव या मानवी मुल्यांवर पुनर्रचना करण्याचे तत्त्वज्ञान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडले. आंबेडकरी चळवळीला सामाजिक समतेची चळवळ म्हटले जाते. परंतु त्याचवेळी स्वयंसेवक संघाने समता या शब्दाला बगल देऊन समरसता हा शब्द पुढे आणला. त्या संकल्पनेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी सामाजिक समरसता मंच ही संघटनाही स्थापन करण्यात आली. आंबेडकरी चळवळीतील विचारवंतांचा संघाच्या समरसता या शब्दाला विरोध आहे.

राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने १२ एप्रिलला केंद्राच्या सूचनेनुसार राज्यातही ग्राम उदयसे भारत उदय अभियान राबविण्यासंदर्भात शासन आदेश काढला आहे. या अभियानांतर्गत घ्यावयाच्या शपथपत्राचा नमुना जोडला आहे. शासन आदेशात व शपथपत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षांत १४ एप्रिल हा राष्ट्रीय समरसता दिवस म्हणून साजरा करीत आहोत, असे म्हटले आहे. आंबेडकरांच्या जयंतीपासूनच केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारने सामाजिक समता याऐवजी आता सामाजिक समरसता या शब्दाचा शासकीय कामकाजात अधिकृकपणे वापर करण्यास सुरुवात केली आहे.