नागपूर ते मुंबई ७०१ किमीचे अंतर आठ तासांत पार करता येणारा बहुचर्चित असा समृद्धी महामार्ग १ मे २०२२ पर्यंत वाहतुकीस खुला होईल असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) गुरुवारी जाहीर केले. प्रकल्पातील नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा टप्पा १ मे २०२१ पर्यंत पूर्ण केला जाईल. टाळेबंदीमुळे या कामास पाच महिन्यांचा विलंब होत आहे.

करोनाचा प्रसार, टाळेबंदी याचा राज्यातील पायाभूत सुविधांच्या कामांना फटका बसला. टाळेबंदीत मजुरांनी मूळ गावी स्थलांतर केल्यामुळे अनेक प्रकल्प ठप्प झाले होते. समृद्धी महामार्गाच्या कामासदेखील याचा फटका बसला. करोनापूर्व काळात नागपूर ते सिन्नर हा टप्पा डिसेंबर २०२० च्या अखेरीस कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र त्यास आता पाच महिने विलंब होत आहे.

‘टाळेबंदीपूर्वी संपूर्ण प्रकल्पावर १८ हजारपेक्षा अधिक कुशल-अकुशल कामगार आणि इतर कर्मचारी कार्यरत होते. टाळेबंदीत ती संख्या १० हजार इतकी कमी झाली. मात्र आज २० हजारपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असून, महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा टप्पा १ मे २०२१ ला सुरू होईल,’ असे एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या टप्प्यातील वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्य़ातील सुमारे ५० किमी मार्गाचे काम बाकी असण्याची शक्यता त्यांनी या वेळी नमूद केली. त्यानंतरच्या सहा महिन्यांत शिर्डी ते इगतपुरीपर्यंतचे कामदेखील पूर्ण करण्यात येणार असून, नागपूर ते इगतपुरी हा ५६३ किमीचा टप्पा १ डिसेंबर २०२१ ला कार्यरत होईल असे मोपलवार यांनी सांगितले.

इगतपुरी ते मुंबई या टप्प्यातील काम डोंगराळ भागातून असल्याने ते काम पूर्ण करण्यास थोडा अधिक कालावधी लागणार आहे. त्यामुळे नागपूर ते मुंबई हा संपूर्ण ७०१ किमीचा संपूर्ण टप्पा १ मे २०२२ ला वाहतुकीस खुला होईल.

समृद्धी महामार्गाच्या निधीसाठी नेपियन सी रोड, वांद्रे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि पुणे-कोल्हापूर मार्गाजवळील एमएसआरडीसीच्या ताब्यातील काही जमिनी दीर्घ मुदतीच्या भाडेकरारावर देण्याचा प्रस्ताव आहे. या माध्यमातून सुमारे १५ हजार कोटी रुपये उभारले जातील.

‘या संदर्भातील प्रस्ताव, निविदा तयार आहेत, मात्र सध्या बाजारात उतरू नये असे सल्लागारांनी सांगितल्यामुळे याबाबत पुढील कार्यवाही केली नसल्याचे,’ मोपलवार यांनी सांगितले. मात्र लवकरच महामंडळाच्या संचालक मंडळ बैठकीत पुढील १५ दिवसांत त्याबाबत ठोस निर्णय घेतला जाईल असे त्यांनी नमूद केले.

गेल्या काही वर्षांत विजेवर धावणाऱ्या वाहनांचा विचार करता समृद्धी महामार्गावर अशी वाहने चार्ज करण्यासाठी प्रत्येक बाजूस १४ याप्रमाणे २८ केंद्रे असतील असे या वेळी मोपलवार यांनी नमूद केले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी लांबीचा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग आहे.

या प्रकल्पाचा खर्च ५५ हजार ३२२ कोटी इतका आहे. त्यापैकी सुमारे ४० हजार कोटी रुपये अभियांत्रिकी कामावर खर्च होतील. दहा जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना हा महामार्ग जोडणार असून नागपूर आणि मुंबई या दोन शहरांमधील अंतर आठ तासांत पूर्ण करता येईल.

१५२.१७ किमी काम पूर्ण

आतापर्यंत या महामार्गाचे १५२.१७ किमी काम पूर्ण झाले आहे. तर महामार्गाच्या बाजूस विकसित केली जाणाऱ्या १९ नवनगरांपैकी (कृषी समृद्धी केंद्र) आठ नगरांचे नियोजन वेगाने सुरू असून पुढील वर्षांच्या जून महिन्यापर्यंत तेथील जमिनी ताब्यात आल्या असतील,असे एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष मोपलवार यांनी या वेळी सांगितले.