शिवसेना आणि भाजपामध्ये ५०-५० चा फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेला नाही असे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, पुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री असेन असा दावा केला आहे. यावर शिवसेनेमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. निवडणुकीपूर्वी जे ठरलं होते तेच द्यायचे आहे. आम्ही काहीही चुकीचे मागत नाही, असे म्हणत ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी फणा काढून बोलण्याची गरज नाही’, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावाला आहे. जनतेने कौल दिला आहे. आमची समजूत काढायची गरज नाही आणि आम्ही काही हट्टाला पेटलेले नाही. सामनामधूनही मी पक्षाचीच भूमिका मांडतो आहे. आमचं जे ठरलं होतं ते सोडून आम्ही वेगळं काय मागतो आहोत? ” असाही प्रश्न संजय राऊत यांनी यावेळी विचारला.

शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देणार असे आश्वासन भाजपाने दिले नव्हते, असे विधान खुद्द मुख्यमंत्र्यांनी केले. ‘अमित शाह यांना फोन करून शिवसेनेला असे आश्वासन दिल्याचे मी विचारले, मात्र शाह यांनी असे कोणतेही आश्वासन दिलं नसल्याचे मला सांगितले,’ असेही फडणवीस म्हणाले. यावर संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त करत घणाघाती टीका केली.

(आणखी वाचा : शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरेच बोलतील : संजय राऊत )

मुख्यमंत्री मीच होणार असं जे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत त्याबाबत काय सांगाल? असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले, ” देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १४५ जागा असतील तर त्यांना कोण रोखणार? उद्या खडसे आले आणि म्हणाले माझ्याकडे १४५ लोक आहेत त्यांना कोण रोखणार? माझ्याकडे १४५ लोक असतील मला कोण रोखणार? शरद पवार १४५ जागा घेऊन आले त्यांना कोण रोखणार? ज्यांच्याकडे एकने जास्त आमदार असेल तो मुख्यमंत्री होईल सरकार बनवेल. एक मताने वाजपेयींचं सरकार पडलं होतं त्यामुळे राजकारणात एक हा अंक खूप महत्त्वाचा आहे.”

(आणखी वाचा : पुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री: देवेंद्र फडणवीस)

दरम्यान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावर पक्षाची भूमिका काय आहे, ते फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच बोलतील असेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.