पिंपरीत होणाऱ्या नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्यासंदर्भातील वक्तव्यामुळे सनातन संस्था पुन्हा एकदा वादात सापडली आहे. सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी श्रीपाल सबनीस यांना उद्देशून, ‘तुम्ही सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉकला जात चला’, अशा आशयाचे ट्विट काही दिवसांपूर्वी केले होते. दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी सनातन संस्था संशयाच्या फेऱ्यात आहे. डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे या दोघांवरही मॉर्निंग वॉकला गेले असतानाच हल्ला झाला होता. त्यामुळे श्रीपाल सबनीस यांना पुनाळेकर यांच्याकडून मॉर्निंग वॉकला जाण्याचा देण्यात आलेला सल्ला अप्रत्यक्ष धमकी आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही दिवसांपूर्वी कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील अल्पवयीन साक्षीदाराला जपा, असा आशयाचे पत्र लिहल्यामुळे पुनाळेकर वादात सापडले होते.


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भातील वक्तव्यामुळे वाद निर्माण झाल्यानंतर श्रीपाल सबनीस यांनी सोमवारी पुण्याचे पोलीस आयुक्त के. के. पाठक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सुरक्षा देण्याची मागणी केली होती. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना, गोध्रा हत्याकांडातील मोदी हा कलंकित मोदी होता. तो माझ्या लायकीचा पंतप्रधान नाही. मात्र, उत्तरार्धातील बदललेला आणि दहशतवाद नष्ट करण्यासाठी सगळीकडे बोंबलत फिरणाऱ्या मोदींचे पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे म्हणजे मरायची लक्षणे होती. कोणाचीही गोळी लागू शकत होती, बॉम्बगोळा पडू शकत होता. तसे झाले असते तर एका दिवसात नरेंद्र मोदी संपला असता आणि आपल्याला मंगेश पाडगावकरांच्या आधीच मोदींची शोकसभा घ्यावी लागली असती, अशी मुक्ताफळे सबनीस यांनी उधळली होती. पंतप्रधानपदावरील व्यक्तीचा एकेरीत उल्लेख केल्यामुळे अनेकांनी सबनीस यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. धुळ्यातील एका व्यक्तीने दूरध्वनीवरून सबनीस यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याशिवाय, धुळे आणि पिंपरीतील भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सबनीस यांचा पुतळा जाळत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. त्यामुळेच श्रीपाल सबनीस यांनी राज्य सरकारकडे स्वत:ला आणि कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली.