रेल्वेमार्गाखालून ४१५ मीटर लांबीची पर्जन्य जलवाहिनी; चार महिन्यांत काम पूर्ण

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात सॅण्डहर्स्ट रोड स्थानकातील रुळांवर आणि हद्दीत मोठय़ा प्रमाणात पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होत असे. ही समस्या सोडविताना साचलेल्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी रेल्वे मार्गाखालूनच ४१५ मीटर लांबीची पर्जन्य जलवाहिनी (मायक्रोटनेल) टाकण्यात आली. मध्य रेल्वे आणि मुंबई पालिकेने अवघ्या चार महिन्यांतच हे काम पूर्ण केले. यामुळे रुळावर पाणी साचले तरी त्याचा लवकर निचरा होण्यास मदत होईल, असा दावा करण्यात आला आहे.

गेली अनेक वर्षे पावसाळ्यात सॅण्डहर्स्ट रोड स्थानकातील रुळांवर व आसपासच्या परिसरात पाणी साचून नागरिकांना फटका बसत होता. स्थानकाबाहेरील रस्त्यावर साचणारे पाणी रुळांवर सोडण्यात येत असल्याने रेल्वे सेवेला फटका बसत होता. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणारी व येणारी लोकल सेवा विस्कळीत होत होती. पाण्याचा लवकर निचराही होत नसल्याने दिवसभर सेवा विस्कळीतच असायची. ही बाब लक्षात आल्यानंतर मध्य रेल्वे व पालिकेने सॅण्डहर्स्ट रोड स्थानक हद्दीतून ४१५ मीटर लांबीची भूमिगत पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेतला. २३ मार्च २०२१ला हे काम हाती घेण्यात आले होते. मे महिन्यापर्यंत २०० मीटर लांबीचे काम पूर्ण झाले होते.

सॅण्डहर्स्ट रोड पूर्वेकडून भूमिगत पर्जन्य जलवाहिनी मुंबई पालिकेच्या पी. डिमेलो रस्त्यापर्यंत नेण्यात आली. हे काम करताना पॉवर केबल्स, पिटलाइन, शेड, मोठे दगड तसेच पी. डिमेलो मार्गावर दोन उच्च दाबाच्या विद्युतवाहिन्या, तीन मुख्य जलवाहिन्यांचाही अडथळा होता. परंतु यांना कोणताही धक्का न लागता भूमिगत पर्जन्य जलवाहिनीचे काम २० जुलैला पूर्ण केल्याची माहिती मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. हे काम पूर्ण झाल्याने सॅण्डहर्स्ट रोड ते मशीद रोड स्थानकात पाणी साचणार नाही अथवा पाणी साचलेच तर त्याचा त्वरित निचरा होईल, असा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात आला.

रेल्वे हद्दीतील सर्वात लांबीची भूमिगत पर्जन्य जलवाहिनी

सॅण्डहर्स्ट रोड स्थानकातील रेल्वेमार्गाखालून गेलेली ४१५ मीटर लांबीची पर्जन्य जलवाहिनी ही देशातील रेल्वे हद्दीतील सर्वात जास्त लांबीची पर्जन्य जलवाहिनी असल्याची माहिती देण्यात आली. मशीद रोड स्थानकातही अशाच प्रकारे भूमिगत पर्जन्य जलवाहिनीचे काम सुरू आहे. त्याची लांबी मात्र १०० मीटरपेक्षा कमी आहे. हे कामही महिनाभरात होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी कुर्ला रेल्वे हद्दीतही साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी भूमिगत पर्जन्य जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले होते.